रत्नागिरीतील एसटी धावली बेस्टच्या मदतीला; 9 आगारातून 104 बसेस मुंबईत 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वेची लोकल सेवा सध्या केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच धावत आहे. इतरांना कामावर जाण्यासाठी बेस्ट बसेसचाच आधार आहे.

दाभोळ  ( रत्नागिरी) -  मुंबई येथील रेल्वेची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने मुंबईत प्रवासी सेवा देणाऱ्या बेस्टवर आता वाहतुकीचा आलेला ताण कमी करण्यासाठी बेस्टच्या मदतीला एसटी धावून गेली आहे. मुंबईमध्ये प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्यभरातून एसटीच्या बसेस चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांसह मुंबई येथे दाखल झाल्या असून रत्नागिरी जिल्ह्यातूनही 9 एसटी आगारातून 104 बसेस मंगळवारपासून (ता. 6) मुंबई येथे रवाना होणार आहेत. 

मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वेची लोकल सेवा सध्या केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच धावत आहे. इतरांना कामावर जाण्यासाठी बेस्ट बसेसचाच आधार आहे. सध्यातरी लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्‍यता नसल्याने मुंबईकरांना त्यांच्या इच्छितस्थळी पोचविण्यासाठी बेस्ट व एसटी महामंडळ यांच्यात करार झाला असून या करारान्वये एसटीच्या बसेस बेस्टने भाड्याने घेतल्या आहेत. यात एसटीचे चालक, वाहक व इतर कर्मचारी एसटीनेच पुरवायचे असून रोजच्या तिकिटाचे पैसे बेस्टकडे जमा करावयाचे आहेत. एका एसटी बससाठी दोन चालक व दोन वाहक व अन्य कर्मचारी मुंबई येथे जाणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळाकडून केली आहे. 

बेस्ट बसेससारखेच प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी तसेच उतरण्यासाठी सोपे जावे यासाठी एसटीचे दरवाजे काढून या एसटी बसेस मुंबईत पाठविण्यात येणार असल्याने प्रत्येक डेपोत आता बसेसचे दरवाजे काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातून प्रत्येक आगारातून बसेस पाठविण्यात येणार असून एकूण 104 बसेस मुंबई येथे जाणार असून त्यात दापोली व देवरूख प्रत्येकी 12, खेड व चिपळूण प्रत्येकी 13, गुहागर- 10, रत्नागिरी- 19, लांजा व राजापूर प्रत्येकी 8, मंडणगड- 9 बसेसचा समावेश आहे. 7 ऑक्‍टोबरला 54, तर 8 ऑक्‍टोबरला 54 बसेस मुंबईकडे कर्मचाऱ्यांसह रवाना होणार आहेत. 

दापोलीतील लांब पल्ल्याच्या गाड्या बंद 
मुुंबईला चांगल्या गाड्या पाठवायच्या असल्याने आता दापोली आगारातून काही लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्या असून त्यात दापोली-शिर्डी बसचाही समावेश आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri Depo Buses Go Mumbai To Help BEST Bus