Photo : पक्षांचा किलबिलाट वाढला ; रत्नागिरीत आढळले 200 पक्षी...

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 27 मार्च 2020

रत्नागिरी शहरालगत असलेल्या सर्व गावांमध्ये मिळून एकूण 200 प्रकाराहून पक्षांच्या प्रजाती आढळून येतात. पण सध्याच्या शहरीकरण, निसर्गामधील मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे पक्षी जागा सोडून दुसरीकडे जात आहेत. मात्र

 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगत असलेल्या सर्व गावांमध्ये मिळून एकूण 200 प्रकाराहून पक्षांच्या प्रजाती आढळून येतात. पण सध्याच्या शहरीकरण, निसर्गामधील मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे पक्षी जागा सोडून दुसरीकडे जात आहेत. मात्र कोरोना विषाणूच्या (कोव्हिड- 19) पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे यातील काही पक्षी आपल्या शहरात पुन्हा येऊ लागले आहेत. यासंदर्भातील काही निरीक्षणे लेन्स आर्टचे छायाचित्रकार अ‍ॅड. प्रसाद गोखले यांनी नोंदवली आहेत. शहरातील वर्दळ आणि माणसांचा वावर कमी झाल्यामुळे हे पक्षी घरामधल्या गॅलरीमधून सुद्धा दिसू लागल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

हौशी छायाचित्रकारांच्या लेन्स आर्ट हा ग्रुप गेल्या तीन वर्षात रत्नागिरीतील पक्षी, फुलपाखरे आणि शहरातील विविध व्यवसायांची छायाचित्रे काढून त्यावर अभ्यास करत आहे. लेन्स आर्टचे नेत्रा आपटे, डॉ. गोंधळेकर, डॉ. वंडकर, डॉ. अश्विन वैद्य, डॉ. प्रणव परांजपे, राहुल सोहोनी, अक्षय तोंडवळकर, अ‍ॅड. प्रसाद गोखले, सिद्धेश वैद्य, विराज आठल्ये, गुरुदेव नांदगावकर, निखीता शिंदे, आशिष शिवलकर आदी अनेक फोटोग्राफर्स रत्नागिरी परिसरात पक्षी निरीक्षण व फोटोग्राफीचे काम करतात. त्यांनी रत्नागिरीमधील पक्षांची बरीच माहिती गोळा केली आहे.

हेही वाचा- जाळ्यात अडकलेल्या जखमी गव्हाणी घुबडाला जीवदान

पुन्हा दिसू लागले शहरात पक्षी
कोरोनामुळे प्रशासनाने संचारबंदी लागू केली. लॉकडाऊनमुळे पूर्ण शहर थांबले आहे. फक्त जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी वाहतूक सुरू आहे. एवढ्या दिवसांत लाखो वाहनांचे इंधनही जळले नाही. त्यामुळे प्रदूषणही झाले नाही. पक्षांनासुद्धा या गोष्टीचा फायदाच झाला आहे, जे पक्षी शहर सोडून निवार्‍याच्या शोधात गावात गेले होते ते पुन्हा शहरात आल्याचे अ‍ॅड. गोखले यांनी सांगितले.

 हेही वाचा- ग्रामीण भागात किराणा दुकानदारांची साठेबाजी ; ग्राहकांची लुट

शहरात आढळलेल्या पक्षांची नावे

पांढरा कुदळ्या, पांढरा शराटी, मोर शराटी, अडई, चक्रांग बदक, थापट्या, वारकरी बदक, सररूची, काणूक बदक, चक्रवाक, नकटा, नंदीमुख, भिवई, टिबुकली, मधुबाज, मोहोळघार, भारतीय ठिपकेदार गरुड, मोठा ठिपकेदार गरुड, सर्पमार गरुड, पांढर्‍या पोटाचा सर्पगरुड, शाहीन फाल्कन, बहिरी ससाणा, अमूर ससाणा, शामा, नीलकर्णी खंड्या, तिबोटी खंड्या, बलाकचोच खंड्या. काळ्या डोक्याचा खंड्या, सामान्य खंड्या, दलदल्या भोवत्या, पांढुरक्या भोवत्या, माँटेग्युजचा भोवत्या, मत्स्य घुबड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri is found in 200 birds kokan marathi news