रत्नागिरी : लोटे MIDC मध्ये वायूगळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 लोटे MIDC मध्ये वायूगळती

रत्नागिरी : लोटे MIDC मध्ये वायूगळती

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीचे युनिट नंबर ५ मध्ये आज सायंकाळी सव्वासहा च्या सुमारास वायूगळतीने एकच गोंधळ उडाला, मात्र यात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, येथील पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या युनिट नंबर पाचमध्ये उत्पादन घेण्याचे काम सुरू असताना दुपारच्या पाळीत सायंकाळी सव्वा सहा वाजता अचानक एच.सी.एल हा वायू वाहून नेणारा पाईप फाटला व संपूर्ण पाईपलाईनला गळती लागली.

त्यामुळे परिसरात धुराचे लोट उसळले. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला व घबराट माजली. कंपनीच्या दक्षिणेकडील बाजूस असणाऱ्या वस्तीत वायूने शिरकाव केल्याने नागरिकांना डोळे जळजळणे गुदमरल्यासारखे होणे असा त्रास होऊ लागला. मात्र कंपनीतील कामगार व अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे एक तासाच्या प्रयत्नानंतर वायू गळतीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नसून कंपनीचे काम पूर्ववत सुरु झाल्याची माहिती कंपनी प्रशासनाकडून मिळत आहे.