रत्नागिरीत हायटेक 'सॅटेलाइट' फोन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

रत्नागिरी - आपत्ती कालावधीत विनाखंडित जलद संवाद साधून, तातडीने मदतकार्य घटनास्थळी पोचवता यावे, यासाठी केंद्र सरकारने देशातील 81 जिल्ह्यांमध्ये हायटेक तंत्रज्ञानयुक्‍त अशी सॅटेलाइट फोन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरी जिल्हा बहुआपत्तीप्रवण असल्याने येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षात "व्हीएसटी' यंत्रणा बसविली जाणार आहे. दहा दिवसांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित होईल. रायगड, पुणे आणि मंत्रालयातही ती बसविण्यात येत आहे.

रत्नागिरीतील आपत्कालीन कक्षात यासाठी वेगळा कक्ष आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक पाहणी करून गेले. या यंत्रणेद्वारे गृहमंत्रालय-दिल्ली-मंत्रालय-मुंबई-रत्नागिरी असे संभाषण करता येऊ शकते. या सॅटेलाइट फोनवरून मोबाईल, दूरध्वनीवरही कॉल करता येऊ शकतो. इंटरनेट सुविधा बंद पडल्यास याचा वापर करता येऊ शकतो. इंटरनेटला हा फोन जोडला की एकाचवेळी 16 संगणक चालविता येतात. त्यामुळे माहिती देवाण-घेवाण कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकेल. रत्नागिरी जिल्हा समुद्रकिनारी असल्यामुळे अचानक किनारी भागात समुद्राचे पाणी घुसणे, नद्यांना पूर येणे, भूस्खलनामुळे गावांना धोका निर्माण होणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. भूस्खनामुळे जीवितहानीही झाली आहे. हे लक्षात घेता या वर्षीच्या पावसाळ्यात सॅटेलाइट फोन उपयुक्‍त ठरणार आहे.

आपत्कालीन स्थितीत नौदल, हवाई दल आणि लष्कराची तत्काळ मदत हवी असेल, तर ते शक्‍य होणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प असून त्यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. भारत संचार निगम लिमिटेड आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्‍त प्रयत्नातून हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. आपत्तीत दूरध्वनी, भ्रमणध्वनी हे कोलमडून पडतात. मदतकार्यात अडथळा निर्माण होतो. त्या अडचणीतून मार्ग काढत आपत्ती व्यवस्थापनाला मदतकार्य करावे लागते. योग्य वेळेत संपर्क झाला नाही, तर मदत पोचू शकत नाही. हे टाळण्यासाठी "सॅटेलाइट' फोनची सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. रायगडमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

अशी आहे सेवा
- तिन्ही सैन्यदलांशी होऊ शकतो संपर्क
- इंटरनेटला जोडून 16 संगणकांचा वापर शक्‍य
- आपत्तीत मोबाईल, दूरध्वनीशीही संपर्क शक्‍य
- पथदर्शी प्रकल्पात रायगडचाही समावेश

आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क यंत्रणा सॅटेलाइट फोनमुळे मजबूत होईल. रत्नागिरी जिल्हा बहुआपत्तीप्रवण भाग असल्याने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
- अजय सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.

Web Title: ratnagiri konkan hitech satellite phone