अधिकाऱ्याकडून करा दहा लाख वसूल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

रत्नागिरी - पालिकेच्या हद्दीतील किरकोळ विक्री शुल्क वसुलीच्या ठेक्‍यावरून पालिकेची आजची विशेष सभा गाजली. कामात हलगर्जीपणा करणे वसुली अधिकाऱ्याला चांगले भोवले आहे. वसुली ठेका देऊन वर्ष व्हायला आले. तीन महिने शिल्लक असताना अजूनही ७० टक्के वसुली शिल्लक आहे. वसुली अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेला आर्थिक भुर्दंड बसू शकतो. याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार आहे. त्याच्या पगारातून ही वसुली करण्यात यावी आणि वसूल झाल्यानंतर त्याला ती परत करण्याचा एकमुखी ठराव पालिकेच्या आजच्या विशेष सभेत घेण्यात आला. संबंधित ठेकेदाराविरोधात पोलिस तक्रारही करण्यात येणार आहे. 

नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली झालेली विशेष सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली. विषयपत्रिकेवरील तेरा विषयांवर चर्चा करण्यात आली. गेल्यावर्षी निवडणुकीमुळे वसुलीच्या मक्‍त्यांना वेळेत मंजुरी देता आली नव्हती. यावर्षी ती री पुन्हा ओढली जाऊ नये, यासाठी सदस्यांनी पालिकेच्या हद्दीमधील रस्त्याच्या कडेला, मच्छी मार्केट, आठवडा बाजार, मंगळवार बाजारात बसून दररोज किरकोळ विक्री करणाऱ्यांकडून विक्री शुल्क वसूली ठेक्‍याला मंजुरी देण्यात आली. या अनुषंगाने शिवसेना गटनेते बंड्या साळवी यांनी गतवर्षाच्या ठेक्‍यातील वसुलीचा मुद्दा उपस्थित केला. गेल्यावर्षी आपण रस्त्याच्याकडेचा ठेका १४ लाख ६२ हजाराला दिला,

शनिवार आठवडा बाजार ११ लाख ७४ हजार, मच्छी मार्केट ३ लाख ५० हजार आणि मंगळवार बाजार २ लाख १० हजाराला लिलाव पद्धतीने दिला होता. ठेका देऊन वर्ष संपायला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. 

प्रत्येक तीन महिन्यांनी टप्प्या-टप्प्याने ही रक्कम पालिकेत भरायची आहे. परंतु वसुलीच्या नावाने ओरड आहे. पहिल्या तीन महिन्यांची रक्कम भरल्यानंतर पुढील रक्कम अजून भरण्यात आलेली नाही. सुमारे १० लाख ९६ हजार रुपये येणेबाकी आहे. 

वसुली अधिकारी मोहिते यांच्या हलगर्जीपणामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मोहिते यांच्यावर कारवाई म्हणून त्यांच्या पगारातून ही वसुली करण्यात यावी. जेव्हा ठेकेदाराकडून रक्कम वसूल करण्यात येईल, तेव्हा त्यांना ती परत करण्यात यावी, असा एकमुखी ठराव घेण्यात आला. 
मात्र भाजपचे मुन्ना चवंडे यांनी मोहितेंना १५ दिवसांची मुदत द्यावी, त्यानंतर वसुली झाली नाही तर या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली.

अधिकारी निरुत्तर
वसुली अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणावरून बंड्या साळवी आणखी भडकले. वसुली अधिकारी श्री. मोहिते यांना सभागृहापुढे बोलावले. त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करून हैराण केले. साळवी यांच्या एकाही प्रश्‍नाचे त्यांच्याकडे उत्तर नव्हते. वसुली झाली नाही, म्हणून तुम्ही ठेकेदारावर काय कारवाई केली विचारता श्री. मोहिते यांनी नोटीस काढली होती, असे उत्तर दिले. मात्र, त्यानंतर पुढे काय केले, याला त्यांच्याकडे उत्तर नव्हते.

Web Title: ratnagiri konkan news 10 lakhs of recovered from the officer