३५ मतिमंद विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 14 जुलै 2017

रत्नागिरी - मतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत ‘आविष्कार’ संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेचा रौप्यमहोत्सव उद्या (ता. १४) साजरा होणार आहे. गेल्या २५ वर्षांत कार्यशाळेच्या ३५ विद्यार्थ्यांचे यशस्वी व्यावसायिक पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी दिली. १९९२ ला कार्यशाळेची स्थापना झाली.

रत्नागिरी - मतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत ‘आविष्कार’ संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेचा रौप्यमहोत्सव उद्या (ता. १४) साजरा होणार आहे. गेल्या २५ वर्षांत कार्यशाळेच्या ३५ विद्यार्थ्यांचे यशस्वी व्यावसायिक पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी दिली. १९९२ ला कार्यशाळेची स्थापना झाली.

रौप्यमहोत्सवानिमित्त सप्टेंबरमध्ये ‘रजतगंध’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. आजवर कार्यशाळेने व्यवसाय प्रशिक्षण हा मुख्य उद्देश जपत प्रौढ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने प्रगती साधायची असेल तर त्यांचा आत्मविश्‍वास वाढवून आत्मनिर्भय बनविणे गरजेचे असते. या करिता विद्यार्थ्यांना विविध अनुभवांना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

पुनर्वसन झालेले विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्वसामान्यांच्या बरोबरीने वावरतात. शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याकरिता त्यांना कार्यशाळेतर्फे मदत दिली जाते. कार्यशाळेच्या माध्यमातून प्रौढ विद्यार्थ्यांना कायदेशीर पालकत्व, नॅशनल ट्रस्टअंतर्गत निरामय विमा योजना, व्यवसायाकरिता आर्थिक मदत देण्याबरोबरच पालक प्रशिक्षण, महिला दक्षता समितीअंतर्गत विद्यार्थिनींची विशेष काळजी घेण्यात येते.

जिल्ह्यातील प्रौढ दिव्यांग व्यक्‍ती येथे प्रशिक्षणाकरिता येतात. काही विद्यार्थ्यांना घरच्या घरी करता येतील अशा उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. मेणबत्त्या, रंगीबेरंगी पाकिटे, स्टेशनरी, बॅग्ज्‌, पर्स, पुष्पगुच्छ, फुले, ज्वेलरी, शुभेच्छापत्र, राख्या, पेपरबॅग्ज, आकाशकंदील, व्हाईट क्‍लिनर, लिक्विड सोप बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या वस्तू विक्रीतून होणाऱ्या नफ्यामधून विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ मिळतो. कार्यशाळेने आयोजित केलेल्या विक्री स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळतो.

आज समुद्रकिनारी वर्षा सहल
वर्धापन दिनानिमित्त १४ जुलैला शामराव भिडे कार्यशाळेतर्फे भाट्ये येथील झरीविनायक मंदिर येथे वर्षा सहल आयोजित करण्यात आली आहे. समुद्रकिनारी मनोरंजनाकरिता क्षमतेनुसार खेळ, वाळूशिल्प, किल्ला केला जाणार आहे. निदेशक वाळकाबाई बोऱ्हाडे यांच्याकडून सहलीकरिता बस, मीनल नागले यांजकडून सहभोजन, वर्षा गांधी यांच्या स्मरणार्थ अमृत गांधी यांच्यातर्फे केक दिला जाणार आहे. कार्यशाळा कर्मचारी, पालक आणि नंदकुमार भाटकर यांचे सहकार्य सहलीसाठी लाभत आहे.

Web Title: ratnagiri konkan news 35 minded student professional rehabilitation