शिकारीचा बेत फसला; सात जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

पोलिसांची हातखंबा येथे कारवाई; बंदुका व काडतुसे जप्त

पोलिसांची हातखंबा येथे कारवाई; बंदुका व काडतुसे जप्त
रत्नागिरी - शिकारीच्या उद्देशाने मुंबई-गोवा महामार्गावर फिरणाऱ्या कारवांची वाडीतील सात जणांना बुधवारी (ता. 30) पहाटे ग्रामीण पोलिसांच्या गस्ती पथकाने हातखंबा येथे ताब्यात घेतले. या शिकाऱ्यांकडे असलेल्या दोन बंदुका, शिकारीचे साहित्य, आठ जिवंत काडतुसे आणि सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली.

संतोष गंगाराम बारगोडे (47), पांडुरंग जानू कांबळे (45), शांताराम लक्ष्मण कळंबटे (44), संजय जानू कांबळे (42), संतोष जानू जोयशी (35), संभाजी गणपत सावंत (61), जानू जोयशी (65, सर्व रा. कारवांची वाडी) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभुते हे कर्मचाऱ्यांसह हातखंबा परिसरात बुधवारी (ता. 30) पहाटे गस्त घालत होते. जंगल असलेल्या भागाजवळ त्यांना एक सुमो संशयास्पदरीत्या आढळून आली. त्यांनी या गाडीतील सात जणांची चौकशी केली. त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी गाडीची तपासणी केली. या वेळी गाडीमध्ये शिकारीचे साहित्य आढळून आले.

त्यानंतर त्यांनी संशयिताना ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या गाडीसह दोन बंदुका, आठ जिवंत काडतुसे, दोन बॅटऱ्या, दोरी आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी किशोर वाघधरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या सात जणांवर अटक करण्यात आली आहे.

Web Title: ratnagiri konkan news crime