चौपदरीकरणाचा आज प्रारंभ - ॲड. पाटणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

रत्नागिरी - गेल्या शतकात रत्नागिरीहून मुंबईला जाण्यासाठी ४० तासांचा प्रवास करून कोल्हापूरला जावे लागत होते, त्यानंतर मुंबईला जाता येत असे; परंतु उद्या (ता. २३) कुडाळमध्ये प्रारंभ होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे हे अंतर ५-६ तासांत पार करता येणार आहे. 

रत्नागिरी - गेल्या शतकात रत्नागिरीहून मुंबईला जाण्यासाठी ४० तासांचा प्रवास करून कोल्हापूरला जावे लागत होते, त्यानंतर मुंबईला जाता येत असे; परंतु उद्या (ता. २३) कुडाळमध्ये प्रारंभ होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे हे अंतर ५-६ तासांत पार करता येणार आहे. 

यात २१ कि.मी. अंतर कमी होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गामुळे दळणवळण, पर्यटन क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. आरंभाच्या पूर्वसंध्येला बोलताना येथील ॲड. विलास पाटणे यांनी पायाभूत सुविधेच्या दृष्टीने या चौपदरीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. कुडाळ येथे मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

एकूण ४७५ कि.मी. लांबीचा ९००० कोटी रुपयांचा महामार्ग डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण होणार आहे. कशेडी येथे १.७२ किमीचा सर्वांत मोठा बोगदा आहे. महामार्गावरील ६४३ वळणे, ८३ किमी लांबीचा घाटमार्ग चौपदरीकरणामुळे संपुष्टात येणार आहे. २२२८ कोटींहून अधिक मोबदला म्हणजे बाजार भावापेक्षा चारपट मोबदला दिला जाणार आहे. कशेडी-ओझरखोल, ओझरखोल ते राजापूर, राजापूर ते झाराप या तीन टप्प्यांत हे काम होणार आहे.

निविदेचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. १९३० मध्ये जेव्हा या महामार्ग बांधणीस सुरवात झाली तेव्हा ताशी ३०-४० किमीचा वेग होता. सध्या तो ७०-८० असून चौपदरीकरणानंतर हा वेग १०० व त्यापेक्षा थोडा वाढणार आहे. २२ ब्रिटिशकालीन पुलांचे पर्यायी पूल बांधकामही प्रगतिपथावर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्प मार्गी लागणार आहे. मधू दंडवते यांनी कोकणात रेल्वे आणली म्हणून नाव घेतले जाते. त्याप्रमाणे गडकरी यांचे नाव महामार्ग चौपदरीकरणाच्या इतिहासात नोंद केले जाईल, असा दावाही ॲड. पाटणे यांनी केला.

गडकरींनी घेतला ध्यास...
देशभरात रस्ते, पूल निर्माणाचा ध्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. डिसेंबर १९९८ मध्ये पूर्णगड पुलाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते गमतीने मला म्हणाले होते ‘तुला आता लेख लिहिण्याची गरज भासणार नाही.’ एका अर्थाने हे खरं आहे. कोकण विकासाने आता टेक ऑफ घेतला आहे, अशा शब्दांत ॲड. पाटणे यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: ratnagiri konkan news highway development