खोंडकिड्याचा धोका

राजापूर - खोंडकिड्याच्या प्रादुर्भावामुळे आंबा कलमांच्या फांद्या मरून झाडे अशी मरणासन्न स्थितीत उभी आहेत.
राजापूर - खोंडकिड्याच्या प्रादुर्भावामुळे आंबा कलमांच्या फांद्या मरून झाडे अशी मरणासन्न स्थितीत उभी आहेत.

नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आदींसह विविध कारणांमुळे आंब्याचे गेल्या दोन वर्षामध्ये उत्पादन आणि उत्पन्न घटल्याने शेतकरी, बागायतदार चिंतातूर झाला आहे. अशा स्थितीमध्ये आंबा कलमांवर खोंडकिड्याच्या प्रादुर्भावाने झालेल्या मोठ्या प्रमाणात नुकसानीने शेतकरी अधिकच नुकसानीच्या खाईत लोटला आहे. आंबा कलमाच्या खोडाचे वारंवार योग्य निरीक्षण आणि काळजी घेतल्यास, त्यातच योग्य औषधांची फवारणी केल्यास त्याला प्रतिबंध घालणे शक्‍य असल्याची माहिती वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक फळसंशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज यांनी दिली. खोंडकिड्याच्या जीवनक्रमासह त्याचा होणारा प्रादुर्भाव आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या.

खोंडकिड्याचा जन्म
राखाडी रंगाचा सुमारे चार ते पाच सेंमी लांबीचा खोंडकिडा असतो. कोयती मारून खोडावर झालेली जखम वा खोडाची साल निघालेली जागा वा खोडाला भेगा पडलेली ठिकाणे, पेचलेली फांदी आदी ठिकाणी खोंडकिड्याची मादी अंडी घालते. मादी एका वेळी सुमारे दहा ते पंधरा अंडी घालते. त्या अंड्यातून विविध कारणांमुळे निम्मी अंडी खराब होऊन अंतिमत: त्याच्यातून चार-पाच अळी जिवंतपणे बाहेर पडतात. त्या अंड्यांमधून बाहेर पडणारी अळी पांढऱ्या रंगाची आणि लांब आकाराची पाय नसलेली असते. 

झाडाच्या खोडामध्ये प्रवेश
पाय नसलेली ही अळी सुरुवातीला खोडाच्या उकटलेल्या सालीच्या ठिकाणाच्या येथून आत प्रवेश करते. सुरुवातीच्या स्थितीमध्ये उकटलेली खोडाची साल खाऊन मोठी होते. सुमारे महिनाभर तिची वाढ झाल्यानंतर ती एक ते दोन सें.मी. लांबीची होते. महिनाभराच्या कालावधीनंतर ती खोडाच्या मुख्य गाभ्यामध्ये प्रवेश करते अन्‌ खोडाला आतून पोखरायला सुरुवात करते. महिनाभराच्या वाढीनंतर तिचे दात चांगलेच मजबूत झालेले असल्याने खोडाचा टणक भागही ती सहज चावून झाडाला पोखरते. एक खोंडकिडा सुमारे १८० ते २०० दिवस खोडामध्ये राहून पोखरण्याचे काम करतो.  

प्रादुर्भावाची लक्षणे 
खोंडकिड्याने झाडाच्या खोडाचा भाग पोखरायला सुरुवात केल्यानंतर झाडामधील अन्नरसशोषण प्रक्रिया मंदावते. त्याचा परिणाम झाडावर होऊन झाडाच्या पानांचा रंग पिवळा होण्याला सुरुवात होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये पिवळी झालेली ही पानेही गळून पडतात आणि झाडावर केवळ मरतुकड्या काड्यासारख्या सुकलेल्या फांद्या शिल्लक राहतात. यावेळी प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. झाडाच्या बुंध्याची बारकाईने पाहणी केली, तर बुंध्याजवळ भुसा पडलेला दिसतो. खोंडकिडा ज्यावेळी खोड पोखरायला सुरुवात करतो त्यावेळी त्यावेळी खोडातून डिंकमिश्रित चोथा बाहेर पडतो. हा चोथा म्हणजेच डिंकमिश्रित भुसा असतो. खोंडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाची पाने गळण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा झाड शेवटच्या घटका मोजायला लागते. एकदा ही सुरुवात झाली की झाड वाचणे कठीण बनते.

कसा शोधायचा खोंडकिडा
आंब्याच्या खोडातील खोंडकिड्याच्या अळीचा शोध घेण्यासाठी जमिनीपासून किंवा ज्या ठिकाणी भुसा पडलेला दिसेल त्या ठिकाणापासून सुमारे एक ते दीड फूट वरच्या बाजूला खोडाचे सूक्ष्म निरीक्षण केले तर छोटे भोक दिसते. या भोकामधून भुसा बाहेर पडत असल्याचे निदर्शनास येते. भुसा येत असलेल्या या भोकातून खोंडकिड्याने खोडामध्ये प्रवेश केलेला असतो. तेथेच तो असतो.

उपाययोजना  
खोंडकिड्याने प्रवेश केलेल्या भोकाला सुमारे अर्धा इंचाच्या ड्रील मशिनचा उपयोग करून खोंडकिड्याने खोडाला पाडलेले भोक मोठे करावे. सुमारे अर्धा इंचाचा पीव्हीसी पाईप घेऊन त्याला एका बाजूला तिरका काप घेऊन तो पाईप त्या भोकामध्ये अडकवून त्यातून औषध टाकायचे. क्‍लोरोपायरीफॉस आणि रॉकेल (किंवा पेट्रोल) प्रत्येकी वीस मि.लि. घेऊन त्याचे मिश्रण करावे. क्‍लोरोपायरीफॉस औषध मिळाले नाही, तर डायक्‍लोरोहॉस त्याच प्रमाणामध्ये रॉकेल वा पेट्रोल घेऊन मिश्रण करावे. तयार केलेले हे मिश्रण हळूहळू आत सोडावे. औषध टाकल्यावर भोकावर तातडीने चिखलाचा गोळा बसवावा. त्यामुळे त्याचा वास जात नाही. औषधाच्या वासाने खोडातील खोंडकिडा मरून जातो. औषधाची मात्रा दिल्यानंतर आठ दिवसांनी चिखलाचा बोळा लावलेल्या ठिकाणी पाहणी करावी. तेथे भुसा आल्यास पुन्हा औषधाची मात्रा द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com