विरोधकांच्या निधीला कात्रीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या केबिन वादाचा फटका भविष्यात विरोधी पक्षातील सदस्यांना बसेल अशी चर्चा सुरू आहे. पहिल्याच सभेत आक्रमक रूप घेणाऱ्या विरोधी पक्षाला चाप बसविण्यासाठी केबिन काढून घेण्याचा निर्णय अध्यक्षा सौ. स्नेहा सावंत यांनी घेतला. केबिन काढल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते विक्रांत जाधव यांनी सेनेच्या ज्येष्ठांनाच लक्ष्य केले आहे. त्यांचा आक्रमकपणा 
अडथळा बनल्यास विरोधकांच्या निधीला कात्री बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाचे गटनेते विक्रांत जाधव यांनी सभा उशिरा सुरू झाल्याचा आक्षेप घेतला. या सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दिवसभर खटके उडत होते. विरोधकांच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेच्या अध्यक्षा सौ. सावंत यांनी विक्रांत जाधव यांच्या केबिनला टाळे लावले. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घमासान सुरू झाले. हा वाद शिगेला पोचला असून सौ. सावंत केबिन न देण्यावर ठाम आहेत. जाधव यांनीही सत्ताधाऱ्यांना आव्हान देत वीस वर्षे जिल्हा परिषदेवर चुली चालविणाऱ्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू, असा इशारा दिला आहे. विरोधकांचा आक्रमकपणा असाच राहिला, तर सत्ताधाऱ्यांकडून गळचेपी धोरण अवलंबले जाण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. विकासकामांसाठी येणाऱ्या निधीत विरोधक सदस्यांना डावलले जाऊ शकते. आधीच जिल्हा परिषदेला शासनाकडून तुटपुंजा निधी प्राप्त होतो. सर्वच भार जिल्हा नियोजनवर आहे. तेथूनही निधीचा ओघ घटल्याने विशेष निधी आणण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यासाठी सत्ताधारी मुख्यमंत्र्यांकडे धावत आहेत. निधी आलाच तर त्यात विरोधी पक्षाच्या सदस्यांवर अन्याय होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच सेसमध्येही त्यांच्या कामांना फाटा बसू शकतो. मागील पाच वर्षांमध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांशी सलोख्याचे संबंध होते. त्याचा फायदा निधी मिळविण्यासाठी होत होता; मात्र केबिनच्या वादामुळे त्याचा भविष्यात कोणता परिणाम होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नियमाप्रमाणे केबिन देता येत नसल्यामुळे ते काढून घेतले आहे. सभांचे कामकाजही नियमांचा आधार घेऊनच चालविले जाणार आहे. सर्वच सदस्यांना आम्ही बोलण्याची संधी देणार आहोत.
- सौ. स्नेहा सावंत, अध्यक्षा

सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत. विरोधी पक्ष काय असतो ते येत्या सभांमध्ये दाखवू देऊ.
- विक्रांत जाधव, गटनेते राष्ट्रवादी

Web Title: ratnagiri konkan news opposition party fund