राष्ट्रवादीला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळणार?

राजेश शेळके
सोमवार, 3 जुलै 2017

शिवसेनेचे मोठे आव्हान - भास्कर जाधवांचा लागणार कस

शिवसेनेचे मोठे आव्हान - भास्कर जाधवांचा लागणार कस

रत्नागिरी - जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ढासळलेल्या बुरुजाला रत्नागिरी तालुक्‍यातच मोठे भगदाड पडले होते. ‘समर संवाद’ मेळाव्याच्या निमित्ताने या तालुक्‍यातूनच पक्षाच्या पुनर्बांधणीचा पाया शनिवारी (ता. २) पक्षश्रेष्ठींनी येथे रचला. वक्तृत्वावर मोठी पकड आणि शब्दाने माणसं जोडण्याची कसब असलेल्या भास्कर जाधव यांना पुन्हा खुले अधिकार दिल्याने राष्ट्रवादी वाढण्यासाठी खतपाणी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळणार की नाजूक परिस्थिती कायम राहणार, याबाबत राजकीय वर्तुुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे रत्नागिरी जिल्हा. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तर ते उघड उघड दिसले. २०१४ पूर्वीची जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी होती. सेनेच्या हा बुरूज ठिकठिकाणी ढासळण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते. पाच विधानसभा मतदारसंघापैकी दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले.

सेनेशी राजकीय दोन हात करण्याची तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद होती. रत्नागिरीतून आमदार उदय सामंत आणि गुहागरातून भास्कर जाधव यांनी सेनेच्या राजकीय नाड्या आवळण्यास सुरुवात केली होती. 

सेनेच्या काही लोकांना हाताशी धरून ही राजकीय खेळी केली होती; परंतु सामंत-जाधव वाद यांचा तेव्हाचा वाद मिटविण्यास पक्षाला रस नव्हता. दोघांनाही झुंजवत ठेवण्याची ती खेळी होती. २०१४ च्या निवडणुकीत पक्षाला ती महाग पडली. उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघतातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. तालुक्‍यातील त्यांचे राजकारण पक्षकेंद्रित नव्हे, तर व्यक्ती केंद्रित होते. उदय सामंत यांच्याभोवती ते फिरत होते. त्यामुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन ते शिवसेनेत गेले. तालुक्‍यात पहिल्या क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेली.

परिणाम येत्या काही दिवसांत...
अडीच ते तीन वर्षे झाली, येथे ढासळलेल्या राष्ट्रवादीला अजून उभारी घेता आलेली नाही. भास्कर जाधवांनी पक्षवाढीसाठी पुढाकार घेतला होता; परंतु त्यांच्याबाबतही राजकारण झाले. त्यामुळे त्यांनी या सर्व निर्णयप्रक्रियेतून अंग काढून घेतले. पालिका निवडणुकीत त्याचा तोटा पक्षाच्या लक्षात आला. राष्ट्रवादी काँग्रेस उभारणीच्या दृष्टीने रत्नागिरीत समर मेळाव्याच्या निमित्ताने सुरुवात झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना काही चुका लक्षात आल्यानंतर त्यांनी भास्कर जाधव यांना पक्षवाढीच्या दृष्टीने खुले अधिकार दिल्याची घोषणा केली. त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसण्याची शक्‍यता आहे.

Web Title: ratnagiri konkan news politics in ratnagiri