पुणे शिवसेनेत उमटणार रत्नागिरीची मुद्रा

पुणे शिवसेनेत उमटणार रत्नागिरीची मुद्रा

उदय सामंतांवर जबाबदारी - ‘मातोश्री’ने दाखविला विश्‍वास

रत्नागिरी - पुण्यामधील शिवसेनेची पुन्हा बांधणी करण्यासाठी आणि मध्यमवर्गीयांनाही शिवसेनेचे आकर्षण वाटेल, अशातऱ्हेने शिवसेनेचा कारभार करण्यासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची निवड करण्यात आली आहे. कोकणातील आणि त्यातही रत्नागिरीतील शिवसेनेच्या नेत्याला मातोश्रीने अशी आव्हानात्मक कामगिरी सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी कोकणातील शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कामगिरीने आपले नाव संघटनेत कोरले आहे. सामंत यांच्या नव्या नियुक्तीमुळे पुणे शिवसेनेमध्ये आता रत्नागिरीची मुद्रा उमटणार आहे.

संघटनात्मक पातळीवर पुण्यासारख्या ठिकाणी काम करणे आणि तेथे पक्ष सावरणे हे सोपे काम नाही. त्यासाठी सामंत यांची निवड झाली. या निवडीमुळे उत्तम संघटक म्हणून ते काम करू शकतात, असा विश्‍वास श्रेष्ठींना वाटतो हेच स्पष्ट होते. मातोश्रीच्या लेखी सामंत यांनी अशी कामगिरी सोपविण्याइतकी वाटचाल अवघ्या दोन वर्षांत केली आहे.  ही बाब महत्त्वाची. सेनेच्या इतर नेत्यांपेक्षा यातच त्यांचे वेगळेपण स्पष्ट होते.

जिल्ह्यात व प्रायशः रत्नागिरी तालुक्‍यात शिवसेना संघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे. जिल्हा परिषदेतील यशाने त्यांची कामगिरी झळाळून उठली होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या किंवा शिवसेना मंत्र्यांत बदल करणार असल्याच्या बातम्या आल्यानंतरच सामंत यांचे नाव चर्चेत येत होते. तेथे त्यांची वर्णी लागली नाही. शिवसेनेत आल्यानंतर पक्षात महत्त्वाचे स्थान मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. शिवसेनेने भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर सुरवातीला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती. शिवसेना नंतर सत्तेत सहभागी झाली. तेव्हा मंत्रिपद मिळण्याची सामंत समर्थकांना अपेक्षा होती. पुण्यासारख्या राज्यातील क्रमांक दोनच्या शहरातील पक्षाची संपर्कप्रमुखाची सूत्रे सामंतांकडे देऊन त्यांची कसोटी पाहिली जाणार आहे. 
 

सामंत यांच्या कर्तृत्वाची पावती
तरुणांची शिवसेना हे समीकरण त्यांना पुण्यात जुळवावे लागेल. थेट लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामंतांना नियोजन करावे लागणार आहे. पक्षाचे बालेकिल्ले म्हणविणारे मतदारसंघ आता भाजपच्या ताब्यात आहेत. ते भाजपच्या हातून खेचणे सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे. त्यामुळेच पक्षाचे पुण्यातील अस्तित्व पणाला लागले असताना ‘मातोश्री’ने सामंत यांच्या हाती जबाबदारी दिली ही त्यांच्या कर्तृत्वाची पावती आहे, अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली.

संपर्कप्रमुखपद हे मोठे आव्हान

रत्नागिरी - शिवसेनेच्या पुण्याच्या संपर्क प्रमुखपदी अखेर माजी राज्यमंत्री आणि पक्षाचे आमदार उदय सामंत यांची नियुक्ती झाली. पुण्यात शिवसेनेने एवढे प्रयोग केले; पण एकाही संपर्कप्रमुखाने प्रभावशाली कामगिरी गेल्या काही वर्षांत केलेली नाही. उलट सध्या शिवसेनेची नीचांकी कामगिरी पुण्यात नोंदविली आहे. त्यामुळे सामंत यांना पुण्याचा कारभार झेपणार का, असा प्रश्‍न पुण्यातील राजकारणात उपस्थित झाला आहे. 

सामंत हे २०१४ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांचे विश्‍वासू म्हणून त्यांचा परिचय होता. नगरविकास खात्याचे राज्यमंत्रिपदही पक्षाने त्यांच्याकडे दिले होते; मात्र स्थानिक समीकरणांमुळे सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा ठोकला. नाट्यपूर्ण रीतीने ते शिवसेनेत सामील झाले. त्यानंतर सातत्याने शिवसेनेची रत्नागिरी जिल्ह्यात घोडदौड सुरू आहे. 

पुण्यात शिवसेनेने संपर्कप्रमुखपदी बरेच प्रयोग केले. रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, गजानन कीर्तीकर आणि डॉ. अमोल कोल्हे आदींनी या पदाची धुरा गेल्या काही वर्षांत सांभाळली. प्रत्येकाच्या कारकिर्दीत टप्प्याटप्प्याने पक्षाची कामगिरी रोडावत गेली. डॉ. कोल्हे हे अभिनेते असल्याने ते पक्षकार्यात वेळ देत नसल्याची तक्रार होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत पक्षाने आपटी खाल्ली. मात्र त्यांनीही पक्षाला फार काही दिले नाही. शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते सध्या सुस्तावलेले आहेत. कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही.

त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना जागे करण्याचे काम सामंतांना करावे लागणार आहे. मनसेला आलेली मरगळ शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडू शकते. त्याचा फायदा घेण्यासाठी काही धोरणे राबवावी लागतील. मनसेकडे गेलेला काही वर्ग शिवसेनेकडे वळवावा लागेल. भाजपची आता पुण्यात पूर्ण सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून जोरदार कामगिरी करावी लागणार आहे. ‘तडजोड’वादी पक्ष म्हणून पुण्यातील मध्यमवर्गीय आता शिवसेनेकडे नाक मुरडत आहेत. ही प्रतिमा सामंत पुसू शकतील का, हा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com