रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. हे मानांकन मिळविणारे कोकणातील ते पहिले पोलिस ठाणे ठरले. या पोलिस ठाण्याचा कित्ता जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांनी गिरवावा, अशा शब्दात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले. मानांकन मिळाल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली. 

रत्नागिरी - रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. हे मानांकन मिळविणारे कोकणातील ते पहिले पोलिस ठाणे ठरले. या पोलिस ठाण्याचा कित्ता जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांनी गिरवावा, अशा शब्दात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले. मानांकन मिळाल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली. 

सर्व सुविधांनी परिपूर्ण पोलिस ठाणे असणे गरजेचे आहे. ठाण्याचा प्रशासकीय कारभार योग्य पद्धतीने हाताळला गेला; तर कमी कालावधीत चांगल्या प्रकारचे काम निश्‍चित होईल. पोलिस ठाण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल. ग्रामीण पोलिस ठाण्याने केलेल्या सकारात्मक गोष्टीमुळे ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. येत्या सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी ‘आयएसओ’ मानांकन मिळण्यासाठी त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

प्रणय अशोक म्हणाले, आयएसओ मानांकन मिळणे पोलिस दलासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सकारात्मक बदलाकडे ही वाटचाल सुरू आहे. १५ ऑगस्टपर्यत जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणी ‘आयएसओ’ करण्याचा मानस होता; मात्र रत्नागिरी ग्रामीणखेरीज उर्वरित पोलिस ठाणी येत्या महिनाभरात आयएसओ होतील. पावसामुळे काही कामे थांबली आहेत. जुलै २०१७ मध्ये यश कन्स्लटिंग सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली.

मानांकनासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची माहिती घेऊन आवश्‍यक त्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले. अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी सात वाजल्यापासून मेहनत करून पोलिस ठाण्याचा कायापालट केला. कंपाउंड भिंत बांधली. महिला अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र्य कक्ष बांधण्यात आला. सर्व अभिलेख प्रत्येक सालाप्रमाणे ठेवण्यात आले. मुद्देमाल खोली, सर्व विभागाचे फायलिंग करताना प्रत्येकाला कलरकोड देण्यात आला. याखेरीज पोलिस ठाण्याच्या इमारतीचा आराखडा, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कक्ष क्रमांक, सूचना पेटी, दर्शनी भागात ठेवण्यात आले. सर्व सुविधांनीयुक्त असे पोलिस ठाणे झाले. तसेच या सगळ्याचा संगणकीय डाटा तयार करण्यात आला. एका क्‍लिकवर प्रत्येक विभागाची माहिती मिळणार आहे. आयएसओ मानांकनाचा दर्जा राखण्याची जबाबदारी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे शिरीष सासणे, जिल्हा विशेष शाखेचे सुरेश कदम आदी उपस्थित होते.

पोलिसांची मेहनत फळाला आली...
जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत ग्रामीण पोलिस ठाण्याचा चेहरा बदलण्यात आला. यासाठी ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतक यांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे ‘आयएसओ’ मानांकनाचा मान ग्रामीण पोलिस ठाण्याला मिळाल्याचे पोलिस निरीक्षक विभूते यांनी सांगितले.

Web Title: ratnagiri konkan news ratnagiri rural police chowki iso