रत्नागिरी आणि विंदांचे अनोखे भावबंध...

मकरंद पटवर्धन
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

प्राध्यापक म्हणून वास्तव्य - भाट्येकिनारी सूर्यास्त न्याहाळण्याचा छंद

प्राध्यापक म्हणून वास्तव्य - भाट्येकिनारी सूर्यास्त न्याहाळण्याचा छंद
रत्नागिरी - प्रखर जीवननिष्ठा प्रभावीपणे कवितेत व्यक्त करणारे विंदा म्हणजेच गोविद विनायक करंदीकर जून 1947 मध्ये येथील गोगटे कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांचे वास्तव्य रत्नागिरीतच होते. या ऋषीतुल्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कवीची जन्मशताब्दी उद्यापासून (ता. 23) सुरू होत आहे. विदांचे कुलदैवत रत्नागिरीजवळील कर्ला गावाचे लक्ष्मीकेशव. त्या अर्थी ते रत्नागिरीचेच आणि अखिल कविकुलाचे स्वतः विंदा कुलदैवत.

यानिमित्ताने ऍड. विलास पाटणे यांनी विंदांच्या आठवणी जागवल्या. पोंभुर्ल्यात वडील एकटेच राहत असल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी गोगटे कॉलेजला पसंती दिली. बाबूराव जोशी यांच्या "मधुबन'मध्ये विंदा राहायला होते. विंदा आणि सुमा वहिनी दोघांचाही पुनर्विवाह. सौ. सुमा करंदीकर महिला विद्यालयात शिक्षिका म्हणून हजर झाल्या. मधुबनात त्यांचा मुलगा आनंदचा जन्म झाला. महर्षी कर्वे यांचे पाय या घराला लागले. याच मधुबनातून विंदांनी आपला रस्ता आखून घेतला व कवितेनेच त्यांना आपल्या गावात नेले.

विंदांचे वडील वेडसर अवस्थेत असल्याने नाइलाजास्तव विंदा त्यांना रत्नागिरीत घेऊन आले. या सर्वांचे सावट त्यांच्या संसारावरही पडले. तरीदेखील विंदा हातात तबला, डग्गा घेऊन शिकायला जात. समुद्रावर बसून तासन्‌तास सूर्यास्त न्याहाळीत. एके दिवशी भाट्याच्या समुद्रकिनारी विंदांच्या कवितेत रमलेले आरती प्रभू मॅट्रिकच्या परीक्षेला जायचे विसरले. माझ्याबरोबर सतत माझं कोकणातील घर असतं असं म्हणणाऱ्या विंदांनी आपल्या कवितेत कोकणचा निसर्ग हळुवार टिपला. विंदा लिमयेंकडे रेडिओवरची गाणी ऐकण्यासाठी तर मांडवीतील सोहोनींकडे बुद्धिबळ खेळायला जात असत.

कलात्मक सच्चेपणा हा विंदांच्या कवितेचा स्थायीभाव. कवितेमधून त्यांचे आत्मचरित्रही खुणावते. संघापासून गांधीवाद, मार्क्‍सवाद हे सारे प्रवाह अंगावर घेत विंदांनी जीवनाचे स्वतःचे तत्त्वज्ञान मांडले. गांधीवादी विचारातून विंदा सूत कातून खादीचे कपडे वापरत. राजाराम कॉलेजमध्ये कवी माधव ज्युलियन यांनी त्यांना साहित्याची प्रेरणा दिली. खांडेकर, कुसुमाग्रजांचा वारसा विंदांनी समथर्पणे पेलला.

विंदांच्या प्रकट मुलाखतीचा योग
विंदांची अनेक साहित्य संमेलनात जवळून भेट झाली. चिपळुणच्या संमेलनात त्यांची प्रकट मुलाखत घेण्याचा योग आला. श्रीनांच्या तुंबाडचे खोत कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त तुंबाडमध्ये खूप गप्पा झाल्या. उंचपुरी देहयष्टी, विरळ केस, तेजस्वी डोळे, रुबाबदारपणा, बोलण्यात सहजता, खादीचा कुर्ता व पायजमा, पायात कोल्हापुरी चप्पल या सगळ्यामागे लपलेला असायचा लहान मुलासारखा निरागसपणा. कोथिंबिरीच्या जुडीच्या किंमतीवरून हुज्जत घालणाऱ्या विंदांनी विविध पुरस्कारातून मिळालेले सात लाख रुपये सामाजिक कार्याला सहज दिले, याकडे पाटणे यांनी निर्देश केला.

Web Title: ratnagiri konkan news ratnagiri & vinda