'वादळी' वातावरणात पर्ससिननेटधारक समुद्रात

राजेश कळंबटे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकृत परवानाधारक २७९ पर्ससिननेट नौका समुद्रावर स्वार होतील. विनापरवाना पर्ससिननेटवाल्यांना व्हीटीएस अत्यावश्‍यक करत शिथिलता दिली आहे. तर मिनी पर्ससिननधारकांचा प्रश्‍न ‘जैसे थे’च आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक मच्छीमारांचा विरोधही वाढत आहे. गेले काही दिवस निसर्गानेही पाठ फिरविली असून समुद्रात वादळी स्थिती आहे. अशा मळभी वातावरणात पर्ससिननेटद्वारे मासेमारीला शुक्रवारपासून (ता. १) आरंभ होत आहे. या वादाची किनार कायम राहणार असली तरीही प्रशासनाच्या भूमिकेवर त्याचा उद्रेक अवलंबून राहणार आहे.
 

रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकृत परवानाधारक २७९ पर्ससिननेट नौका समुद्रावर स्वार होतील. विनापरवाना पर्ससिननेटवाल्यांना व्हीटीएस अत्यावश्‍यक करत शिथिलता दिली आहे. तर मिनी पर्ससिननधारकांचा प्रश्‍न ‘जैसे थे’च आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक मच्छीमारांचा विरोधही वाढत आहे. गेले काही दिवस निसर्गानेही पाठ फिरविली असून समुद्रात वादळी स्थिती आहे. अशा मळभी वातावरणात पर्ससिननेटद्वारे मासेमारीला शुक्रवारपासून (ता. १) आरंभ होत आहे. या वादाची किनार कायम राहणार असली तरीही प्रशासनाच्या भूमिकेवर त्याचा उद्रेक अवलंबून राहणार आहे.
 

पावसाचे सावट
गणेशोत्सवात वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमारीला ब्रेक लागला होता. आज पावसाने उसंत घेतल्यामुळे खवळलेला समुद्र शांत झाला आहे. शुक्रवारी समुद्रात जाण्यासाठी मच्छीमारांचा मार्ग मोकळा आहे. त्याचा फायदा पहिल्याच दिवशी मिळेल अशी आशा व्यक्‍त केली जात आहे; परंतु यावर्षी पावसाळ्यात मोठे वादळ गेले नसल्याने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

कालावधी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर
मत्स्य दुष्काळावर पर्याय म्हणून शासनाने पर्ससिननेट नौकांवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी १२.५ वावाची मर्यादा घालून दिली आहे. कालावधी वाढविण्यासाठी पर्ससिननेट नौकाधारकांनी आंदोलनांसह कायदेशीर लढाईचाही प्रयत्न केला होता; मात्र त्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत पर्ससिननेटधारक मिळालेल्या कालावधीचा उपयोग करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कळीचा मुद्दा
काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत पारंपरिक मच्छीमारांच्या नेत्यांनी पर्ससिननेट मच्छीमारीविरोधात एल्गार करू,  असा इशारा दिला होता. पर्ससिननला साडेबारा वावाच्या बाहेर जाऊन मासेमारी करण्यास परवानगी आहे. काही मच्छीमार त्याचे उल्लंघन करतात. त्यांच्यावर कारवाई होतेच असे नाही. त्यातूनच वादाला तोंड फुटते. पर्ससिननेटच्या जाळ्यात छोटे मासे सापडत असल्याने पारंपरिक मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांच्या जाळ्याचा व्यास कमी असल्याने सरसकट मासेमारी होऊन नैसर्गिक समतोल बिघडण्याचे काम पर्ससिनधारक करीत आहेत.

‘व्हीटीएस’चा दिलासा
पर्ससिननेटचा परवाना नसलेल्या मच्छीमारी नौकांना शासनाकडून दिलासा मिळाला आहे. व्हीटीएस बसवून १२ नॉटिकल माइल्सच्या (२४ वाव) बाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. तसे पत्र मत्स्य विभागाला प्राप्त झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मत्स्य विभागाकडून व्‍हीटीएस बसविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात ७० जणांचा समावेश आहे. पर्ससिननेट परवाना असलेल्या १४० जणांना व्हीटीएसची परवानगी मिळाली आहे. ७७ जणांनी नौकांवर मशिन बसविली आहेत. शुक्रवारपासून समुद्रात जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पाच पट दंडाची कारवाई
मिनी आणि पर्ससिननेटद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांविरोधात मत्स्य विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. गेल्यावर्षी दहा महिन्यांच्या कालावधीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या १४० नौकांवर कारवाई करण्यात आली. तहसील कार्यालयाकडून त्यांच्यावर पाच पट दंड बसविला आहे. जप्त केलेल्या मालानुसार त्यांना दंड आकारण्यात आला आहे. त्या मच्छीमारांकडून ५२ लाख १६ हजारांचा दंड वसूल केला आहे. कारवाईमुळे विनापरवाना मासेमारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी मत्स्य विभाग सज्ज आहेत. मोठ्याप्रमाणात उलाढाल होणाऱ्या बंदरांवर पथके कार्यरत आहेत.
- आनंद पालव, मत्स्य परवाना अधिकारी

पर्ससिननेट नौकांबरोबर परवाने नसलेल्या मिनी पर्ससिननेटसारख्या नौका मासेमारी करतात. पारंपरिक नौका किनाऱ्यापासून जवळ मासेमारी करतात. त्या क्षेत्रात अतिक्रमण झाले, तर त्याचा परिणाम पारंपरिकवर होतो.
- अभय लाकडे, पारंपरिक मच्छीमार

समुद्रातील वातावरण बिघडलेले आहे. त्यामुळे उद्याचा मुहूर्त हुकण्याची शक्‍यता आहे. रात्री परिस्थिती कशी राहील यावरच निर्णय होईल. सुरवातीला पर्ससिननेटला बांगडा मोठ्याप्रमाणात मिळतो. त्याचा फायदा मिळेल; मात्र ही गणिते निसर्गावर अवलंबून आहेत.
- पुष्कर भूते, मच्छीमार

Web Title: ratnagiri konkan news storm environment ship in sea