भाट्ये किनारचे वीरगळ राजापुरातील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

ऐतिहासिक ठेवा - विसर्जित केलेले वीरगळ रुतले

रत्नागिरी - वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला वीरगळ अथवा वीरस्तंभ भाट्ये येथील समुद्रकिनारी आढळला. राजापुरातील एका मंदिराच्या आवारातील हे वीरगळ असल्याची माहिती पुढे येत आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी हे वीरगळ झरीविनायक मंदिरासमोरील किनारी विसर्जित करण्यात आले; पण वजनदार असल्याने ते वाहून न जाता तेथेच रुतून बसले. जागरूक युवकांनी हे वीरगळ असल्याचे ओळखून तज्ज्ञांना माहिती दिली. शिलाहार किंवा यादवकाळातील हे वीरगळ असण्याची शक्‍यता आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकात बऱ्याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात शिळाशिल्पे आढळतात. संगमेश्‍वर तालुक्‍यात असे अनेक वीरगळ पडून आहेत. वीरगळावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. तेच हे वीरगळ. वीरगळ हा शब्द वीर (संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे.

कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ. वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणाऱ्यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राण गेले तर त्याचे वीरगळाच्या रूपाने स्मारक उभारण्यात येत असे. भाट्यात सापडलेले वीरगळ उभट, आयताकृती दगड असून वर घुमटी अशी रचना आहे. चौकटीमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. वीरगळांवर वीराचे नाव कोरलेले नाही. शंकराच्या पिंडीची उपासना, धनुष्यबाणाने युद्धाचा प्रसंगी यावर कोरलेला आहे.

भाट्यात मूर्ती असल्याचा निरोप लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी दिला. त्यानंतर कॅप्टन दिलीप भाटकर, सरपंच पराग भाटकर व ग्रामस्थ मदतीने या मूर्ती पाण्यातून बाहेर काढल्या. हा ठेवा गावाने जपावा. हे शक्‍य नसल्यास आम्हाला संपर्क साधावा.
- सुधीर रिसबूड, पर्यावरणप्रेमी

Web Title: ratnagiri konkan news virgal receive on bhatye beach