रत्नागिरी जिल्ह्यातील 188 शाळा होणार बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

रत्नागिरी - शासनाच्या आदेशानुसार वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 188 शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. तसे आदेश त्या-त्या तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. बंद झालेल्या शाळांमधील साडेतीनशे शिक्षकांची नियुक्‍ती जवळच्या शाळेत केली जाणार आहे. 

रत्नागिरी - शासनाच्या आदेशानुसार वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 188 शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. तसे आदेश त्या-त्या तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. बंद झालेल्या शाळांमधील साडेतीनशे शिक्षकांची नियुक्‍ती जवळच्या शाळेत केली जाणार आहे. 

शासनाने 2009- 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहावी आणि शिक्षकांची नोकरीही आबाधित राहावी, यासाठी शाळा स्थलांतरित करण्यात येणार आहेत. प्राथमिक शाळा एक किलोमीटरवर, तर माध्यमिक शाळा तीन किलोमीटरच्या आत स्थलांतरित केल्या जातील. याची अंमलबजावणी शिक्षण विभाग करणार आहे. राज्यस्तरावरून गुगल मॅपचा आधार घेऊन यादीही तयार करण्यात आली आहे. खर्चाचा भार कमी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्याच्या वित्त विभागाने केल्या होत्या. कमी पटाच्या शाळांची आवश्‍यकता तपासून त्या बंद कराव्यात आणि तेथील विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी पाठवावे असे आदेश होते. 

शून्य ते पाच पटसंख्येच्या शाळा विलीनीकरणाबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांना विश्वासात घेण्यात आले. एक किलोमीटर अंतरावरील शाळांचे विलीनीकरण करण्याची कार्यवाही नोव्हेंबर 2017 पासून हाती घेण्यात आली. डिसेंबर 2017 मध्ये कमी पटांच्या शाळांची अंतिम यादी मागवण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेची तपासणी करण्यात आली. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात 188 शाळांची पटसंख्या ही अत्यंत कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्या सर्व शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत समायोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात एक हजाराहून अधिक विद्यार्थी असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. जे शिक्षक अतिरिक्‍त ठरणार आहेत, त्यांना जवळच्या शाळेत नियुक्‍त केले जाणार आहे. शिक्षक बदल्यांवेळी त्या शिक्षकांची नियुक्‍ती जादाकडून कमीकडील पटसंख्येच्या शाळेत केली जाईल. जिल्ह्यात सातशेहून अधिक शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. शाळा बंदच्या निर्णयामुळे शिक्षक अतिरिक्‍त ठरणार नाहीत, असा दावाही शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. 

तालुक्यानुसार बंद शाळाची संख्या

  • मंडणगड...... 6 

  • दापोली......... 5 

  • खेड..... 17 

  • चिपळूण..... 37 

  • गुहागर..... 2 

  • संगमेश्वर ......52 

  • रत्नागिरी....... 23 

  • लांजा ........19 

  • राजापूर...... 15 

Web Title: Ratnagiri News 188 schools will be closed