रत्नागिरी शहरात दोन किलो गांजा जप्त 

राजेश शेळके
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी -  अमली पदार्थांच्या मोठ्या साखळीने शहरातील पोलिस ठाण्यालगतचा भाग पोखरून टाकला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अमली पदार्थ विक्रीच्या या रॅकेटचा शहर पोलिसांच्या डीबी स्कॉडने मंगळवारी (ता. 31) रात्री पर्दाफाश केला. सुमारे पाच तास सर्च ऑपरेशन करून 27 हजारांचा 2 किलो गांजा जप्त केला.

रत्नागिरी -  अमली पदार्थांच्या मोठ्या साखळीने शहरातील पोलिस ठाण्यालगतचा भाग पोखरून टाकला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अमली पदार्थ विक्रीच्या या रॅकेटचा शहर पोलिसांच्या डीबी स्कॉडने मंगळवारी (ता. 31) रात्री पर्दाफाश केला. सुमारे पाच तास सर्च ऑपरेशन करून 27 हजारांचा 2 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक केली असून त्यात पोलिस रेकॉर्डवरील गुंडांचा समावेश आहे. तरुण पिढीला व्यसनात गुरफटणारी ही साखळीच तोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. 

मच्छी मार्केट परिसरामध्ये तीन संशयित या कारवाईत पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्याकडून 2 किलो गांजा जप्त करण्यात आला. सुमारे 27 हजार रुपये किमतीचा हा गांजा आहे. अश्रफ ऊर्फ अडऱ्या मेहमूद शेख (रा. खान कॉम्प्लेक्‍स मच्छी मार्केट), दाऊद अल्लाउद्दीन होडेकर (रा. झारणी रोड), अनिकेत किशोर ठाकूर (रा. धनजीनाका) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. 

शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वारंवार पोलिस यंत्रणेला दिली होती. काही प्रसारमाध्यमांनी स्टिंग ऑपरेशन केले होते. परंतु, अमली पदार्थ कायद्यांतर्गत कारवाई करणे अतिशय किचकट असल्याने यामध्ये कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांनी हात घातला नव्हता.

नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनाही ही बाब पत्रकारांनी सांगितल्यानंतर त्यांनी लवकरच तुम्हाला रिझल्ट देऊ, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार श्री. इंगळे, शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी आदींच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. डीबी स्कॉडला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सर्व शक्‍यता लक्षात घेऊन मोठा फौजफाटा आणि लवाजमा गोळा करून मच्छी मार्केट परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. काल रात्री साडे दहा ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. 

अमली पदार्थांची विक्री करणारी ही एक मोठी साखळी आहे. त्यातील काही कड्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. साखळीतले प्रत्येक दुवे शोधून काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गांजा पकडण्याची कारवाई करणाऱ्या पथकाचे पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी विशेष अभिनंदन केले. 

अमली पदार्थ विक्री करणारी मोठी साखळी शहरात कार्यरत आहे. तरुण पिढीला बरबाद करणारी ही साखळीच उद्‌ध्वस्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजची कारवाई ही त्याचीच सुरवात आहे. भविष्यात अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. 
- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी 
 

Web Title: Ratnagiri News 2 KG Ganja seized