गतवर्षीच्या तुलनेत 25 टक्‍केच आंबा बाजारात

राजेश कळंबटे
रविवार, 4 मार्च 2018

रत्नागिरी - वातावरणाचा तडाख्यामुळे यावर्षी मार्च महिन्यातील वाशी बाजारपेठेतील आवक गतवर्षीच्या तुलनेत अवघी 25 टक्‍केच झाली आहे. गतवर्षी यावेळी आठ ते नऊ हजार पेटी कोकणातून जात होती; मात्र यावर्षी दोन हजार पेटीच वाशीत जात आहे.

रत्नागिरी - वातावरणाचा तडाख्यामुळे यावर्षी मार्च महिन्यातील वाशी बाजारपेठेतील आवक गतवर्षीच्या तुलनेत अवघी 25 टक्‍केच झाली आहे. गतवर्षी यावेळी आठ ते नऊ हजार पेटी कोकणातून जात होती; मात्र यावर्षी दोन हजार पेटीच वाशीत जात आहे.

सध्या तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसमध्ये स्थिरावल्यामुळे मागील पाच दिवसांत आंबा वेगाने तयार होत आहे; मात्र बारीक कैरी उन्हामुळे पिवळी पडून गळून जात आहे.

 मागील पाच दिवसांमधील तापमान

तारीख.......... कमाल........... किमान
3 मार्च.......... 35................. 20
1 मार्च.......... 36................ 19
28 फेब्रु.........36..................18
27 फेब्रु.........38..................19

हापूसबरोबर केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या आंब्याचीही आवक घटल्याचा दावा वाशीतील व्यावसायिकांनी केला. त्यामुळे दर स्थिर आहे. सध्या वाशीत हापूसचा दर पेटीला तीन ते सहा हजार रुपये आहे. आवकच घटल्याने हा दर कायम राहील असा अंदाज आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये उष्णतेची लाट संपूर्ण महाराष्ट्रात आली आहे. पाराही 34 अंश सेल्सिअसवरून पुढे सरकू लागला आहे.

मागील चार दिवसांमध्ये आवक वाढली आहे; परंतु दर अधिक असल्याने निर्यातीला उशीर होईल. युरोपमधून मागणी आहे. स्थानिक बाजारात दर चांगला आहे. त्यामुळे 20 मार्चनंतरच युरोपची निर्यात सुरू होईल.

- संजय पानसरे, वाशी

वाढत्या उष्म्यामुळे कैरी पिवळी पडत असून एप्रिलमधील उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. सर्वसामान्यांना आंबा चाखण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- प्रसन्न पेठे, बागायतदार

27 फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअसची नोंद झाली. मागील पाच वर्षांचा आढावा घेतला, तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा चढाच राहिलेला आहे. उष्म्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील आंबा वेगाने तयार होतो. तो काढण्यासाठी बागायतदारांची तारांबळ उडते. यावर्षी ही गडबड कमी असल्याचे चित्र आहे.

ओखीमुळे हंगाम एक महिना लांबला आहे. मार्चमध्ये येणाऱ्या पिकावर संक्रात आली असून कोकणातून अवघ्या दोन हजार पेटीच आंबा वाशीला रवाना झाला आहे. सर्वात मोठी बाजारपेठ वाशीला असल्याने सर्वाधिक बागायतदार तिकडे आंबा पाठवतात. गेल्यावर्षी 3 मार्चपर्यंत नऊ हजार पेटी रवाना झाली होती; मात्र यंदा 3 मार्चपर्यंत अवघी 2300 पेटी आंबा बाजारात दाखल झाल्याची नोंद आहे. वाशीतून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसांत सरासरी दोन हजार पेट्या येत आहेत. यापूर्वी सरासरी अवघ्या चारशे ते सहाशे पेट्या येत होत्या.

तापमानामुळे आवक वाढल्याचे सांगण्यात आले. दर घसरला तर मात्र बागयातदारांवर संक्रात येण्याची शक्‍यता आहे. वाढत्या तापमानाचा फटका बारीक कैरीला बसत आहे. सकाळच्या सत्रात धुके आणि वातावरण थंड असते. दुपारच्या सत्रात कडाक्‍याची उन्हे असल्याने आंब्याला वाचविण्यासाठी बागायतदारांना फवारणीचा आधार घ्यावा लागत आहे.

 

Web Title: Ratnagiri News 25 percent Mango in Market