राजवाडीत साठवले ३५ लाख लिटर पाणी अन् केला वाडीचा विकास

संदेश सप्रे
गुरुवार, 8 मार्च 2018

देवरूख - पुराणात भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी काय पराकाष्ठा केली ही कथा सर्वश्रुत आहे. याच भगीरथाच्या तोडीस तोड काम करीत राजवाडीतील आधुनिक भगीरथांनी चक्‍क डोंगर माथ्यावर शेततळे बांधत त्यात साठलेले ३५ लाख लिटर पाणी कोणत्याही यांत्रिकी मदतीशिवाय वाडीत आणून पोचवले आहे.

देवरूख - पुराणात भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी काय पराकाष्ठा केली ही कथा सर्वश्रुत आहे. याच भगीरथाच्या तोडीस तोड काम करीत राजवाडीतील आधुनिक भगीरथांनी चक्‍क डोंगर माथ्यावर शेततळे बांधत त्यात साठलेले ३५ लाख लिटर पाणी कोणत्याही यांत्रिकी मदतीशिवाय वाडीत आणून पोचवले आहे.

हेच पाणी या वाडीत उन्हाळी शेतीसह ग्रामस्थांसाठी जणू गंगाच ठरले आहे. पेम संस्थेचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राजवाडी वरचीवाडीच्या ग्रामस्थांनी ही अशक्‍य गोष्ट शक्‍य करून दाखवली आहे.

शासनाचे मागेल त्याला शेततळेला एवढा निधी नाही. त्यामुळे आम्ही वेगळा प्रयोग केला. बासुरी फाऊंडेशनप्रमाणेच शासनाचा निधीही मिळाला. मी फक्‍त निमित्तमात्र आहे. सर्व श्रेय ग्रामस्थांना जाते. त्यांची जिद्द आणि चिकाटी या कामात महत्त्वाची ठरली आहे.
-सतीश कामत,
अध्यक्ष, पेम संस्था.

बारमाही शेती आणि सेंद्रिय भाजीपाल्यामुळे प्रसिद्धीस आलेल्या राजवाडीच्या टेकडावर वसलेल्या वरचीवाडीत पाण्याअभावी उन्हाळी शेती शक्‍य होत नव्हती. २०१६ मध्ये सतीश कामत यांनी पुढाकार घेतला. इथे नवजीवन ग्रामविकास गटाची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष सुरेश बाईत आणि सचिव जयराम भडवलकर यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले.

कामतांनी स्वतःच्या सपाट जमिनीत ग्रामस्थांच्या मदतीने ३० बाय ३० चा खड्डा खणला.  पुण्यातील बासुरी फाऊंडेशनने इथेही सर्वांना मदत केली. पहिल्या वर्षी पाणीसाठा न करता गतवर्षीच्या पावसाळ्यात तब्बल ५ लाख रुपये खर्च करून हे शेततळे पूर्ण करण्यात आले आणि त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यात आले. आज या तळ्यात २५ लाख लिटर पाणी साठा आहे. 

तळ्यात पाणी साठले तरी पुढे अडचण होतीच, मात्र त्यावरही मात करीत तब्बल दीड किमीची पाईपलाईन टाकत कोणत्याही विद्युत पंपाशिवाय केवळ डोंगर उताराच्या साह्याने वरचीवाडीत पाणी पोहोचवण्यात सर्वांना यश आले. वर्षातील ६ महिने ज्यांना पाण्याचे दर्शनच होत नव्हते. त्या २३ कुटुंबांना या तळयातून आलेले पाणी पाहून आनंदाश्रू अनावर झाले. याच पाण्याच्या जोरावर राजवाडीच्या वरचीवाडीत उन्हाळी शेती सुरू झाली. २० एकर जमीन ओलिताखाली आली आहे. उन्हात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी इथे विशेष प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: Ratnagiri News 35 lakh liter water stored in Rajwadi