साडेचार कोटी लुटणारी टोळी जेरबंद

संदेश सप्रे
बुधवार, 20 जून 2018

संगमेश्‍वर - साखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा वापर करत एका टोळीने लांबविण्याचा प्रकार पुढे आला आहे. ही रक्कम आणि माजी अधिकाऱ्याचे अपहरण करून पळून जाणाऱ्या टोळीला देवरूख व संगमेश्‍वर पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. तीन संशयितांसह साडेचार कोटींची रक्कम आणि गाडी जप्त करण्यात आली.

संगमेश्‍वर - साखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा वापर करत एका टोळीने लांबविण्याचा प्रकार पुढे आला आहे. ही रक्कम आणि माजी अधिकाऱ्याचे अपहरण करून पळून जाणाऱ्या टोळीला देवरूख व संगमेश्‍वर पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. तीन संशयितांसह साडेचार कोटींची रक्कम आणि गाडी जप्त करण्यात आली.

गजानन महादेव अदडीकर (वय ४५, बदलापूर), महेश कृष्णा भांडारकर (५३, घोडबंदर ठाणे), चालक विकास कुमार मिश्रा (३०, जोगेश्‍वरी, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकारातील अन्य दोन मोटारींपैकी एक मोटार चिपळूण तालुक्‍यात सापडल्याचे समजते. तिसरी मोटार संगमेश्‍वर तालुक्‍यात असल्याचे वृत्त आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - कर्नाटकमधील एका माजी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याचे अपहरण (नाव समजले नाही) करून संबंधित अपहरणकर्ते पुणे-बंगळूर मार्गाजवळ कराड येथे उभे होते. याचवेळी ज्ञानयोगी शिवकुमार साखर कारखान्याचे (विजापूर) साडेचार कोटी रुपये घेऊन एक गाडी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पुण्याकडे निघाली होती. त्याची खबर संशयितांना लागली होती.

संशयितांनी कऱ्हाडमधील एका हॉटेलजवळ ही गाडी अडवली. अपहरण केलेल्या माजी पोलिस अधिकाऱ्याला आधाराने आपण स्वतः पोलिस असल्याचे भासवत तुमच्या गाडीतून नेण्यात येणारी रक्‍कम संशयास्पद आहे. आधी आमच्याबरोबर पोलिस ठाण्यात चला, तिथे काय तो फैसला करू, असे सांगितले. त्या गाडीतील साडेचार कोटी रुपये असलेल्या बॅगा आपल्या ताब्यात घेतल्या. आज सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार रस्त्यावर घडला. याची खबर सातारा पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबत गृह विभागाशी संपर्क साधत संपूर्ण राज्यात हायअलर्ट जारी केला. यानंतर रकमेसह पळालेल्या मोटारीचा क्रमांक (एमएच-४८-एफ-२०५६) सर्व पोलिस ठाण्यात दिला. 

त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या आदेशानुसार नाकाबंदी करण्यात आली. संगमेश्‍वर, साखरपा, देवरूख परिसरात नाकाबंदीला पोलिस तैनात होते. संशयित गाडी घेऊन कराड कोकरूडमार्गे मलकापूर आंबा घाटातून कोकणात आल्याचे समजले. ही गाडी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून रत्नागिरीकडून संगमेश्‍वरकडे येत असल्याचे पोलिसांना समजले, मात्र पोलिस मागावर असल्याचे समजताच त्यांनी मार्ग बदलला. महामार्गावरून कोळंबे-ताम्हाने-कोसुंबमार्गे संगमेश्‍वरला जाणे पसंत केले. याचवेळी या गाडीची खबर मिळाल्याने देवरूख आणि संगमेश्‍वर पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. यात संगमेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बस स्थानकाजवळ गाडी अडवून ताब्यात घेण्यात आली. या गाडीतून तीन संशयितांना ताब्यात घेतले. 

यानंतर गाडीसह त्या तिघांची वरात संगमेश्‍वर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक स्वतः संगमेश्‍वरात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत ही रक्‍कम मोजण्याचे काम सुरू होते.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
संशयितांना पकडण्यासाठी देवरूख आणि संगमेश्‍वर पोलिसांनी आज संध्याकाळी जीवाचे रान केले. संपूर्ण तालुक्‍यात पोलिसांनी या गाडीचा थरारक पाठलाग केला. त्यानंतर संध्याकाळी ६.४० वाजता संगमेश्‍वरात ही गाडी पकडण्यात पोलिसांना यश आले. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी या कौतुकास्पद कामगिरीबद्दल देवरूखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील, संगमेश्‍वरचे महेश थिटे यांच्यासह सर्व पोलिसांचे कौतुक केले आहे.

दोघे चिपळूण पोलिस ठाण्यात हजर
माजी पोलिस अधिकारी आणि एकजण मुंबई-गोवा महामार्गावर लघुशंकेचे कारण देत गाडीतून उतरले. इतरांना चकवा देत तेथून दोघे पसार झाले आणि थेट चिपळूण पोलिस ठाण्यात हजर झाले. दोघांची नावे समजलेली नाहीत. चिपळूण पोलिस ठाण्यातील प्रमुख अधिकारी त्या दोन गाड्यांचा शोध घेण्यासाठी संगमेश्‍वर येथे गेल्यामुळे त्या दोघांचाही जबाब रात्री उशिरापर्यंत झालेला नव्हता.

इस्टेट एजंट असल्याचा दावा
दरम्यान, यातील चालक सोडून उर्वरित दोघेजण आपण इस्टेट एजंट असून ही रक्‍कम स्वतःची असल्याचे पोलिसांना सांगत होते. मात्र पोलिसांनी गाडीतून रोख रकमेच्या तीनही बॅगा हस्तगत केल्या.

असे घडले अपहरण आणि लूटमारीचे नाट्य

कऱ्हाड - कारखान्याच्या ऊसतोड मजुरांचा करार करण्यासाठी साडेचार कोटींची रक्कम घेऊन विजापूरहून आलेल्या पाच जणांना लुटण्यात आले. त्यातील एका निवृत्त पोलिस उपअधीक्षकासह दोघांचे अपहरण केल्याचा प्रकार येथे उघडकीस आली. अपहरणावेळी निवृत्त पोलिस उपअधीक्षक चौकीमट यांनी व अन्य एकाने शिताफीने अपहरणकर्त्याच्या हातून सुटून पोलिसांना माहिती दिल्याने अवघ्या काही तासांतच संशयितांना पकडणे शक्‍य झाले. 

पोलिसांनी सांगितले, की विजापूर येथील हिरे देवनूरच्या श्री ज्ञानयोगी शिवकुमार स्वामीजी साखर कारखान्यास ठाणे येथील किंग फायनान्स कंपनीने सुमारे १७२ कोटींचे कर्ज मंजूर केले होते. याच फायनान्स कंपनीबरोबर ऊसतोड व वाहतूक टोळ्यांचा करार करण्यासंदर्भात मंगळवारी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर गुरुगौडा बिरादार कऱ्हाड येथे आले होते.

त्यांच्यासोबत कारखान्याचे सुभाष पाटील, दिलीप म्हात्रे, मोहन भाई व श्री. चौकीमटही सोबत होते. त्यांच्यासोबत साडेचार कोटींची रक्कमही होती. त्यांची बोलणी एका आलिशान हॉटेलमध्ये होणार होती. दुपारी सव्वादोनच्या सुमारास ते सेवारस्त्याने कऱ्हाडला येत होते. त्या वेळी त्यांना दोन इनिव्हा कार आडव्या आल्या. त्यातील दहा लोकांनी त्यांना अडविले. त्यांनी जबरदस्तीने त्यांना त्यांच्या गाडीत बसविले. ते रकमेसह संबंधितांचे अपहरण करून पसार झाले.

ते उंब्रजकडे गेले. त्याच्या अलीकडे बिरादार व पाटील यांना गाडीतून खाली उतरवण्यात आले. त्यांनी त्वरित पोलिसांना अपहरण व लुटीची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. राज्यभर नाकाबंदीचे मेसेज दिले. त्यानुसार पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणातही नाकाबंदी झाली. अपहरण झालेले श्री. चौकीमट व अन्य एक जण शिताफीने चिपळूणजवळ अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटले. त्यांनी थेट चिपळूण पोलिसांत माहिती दिली.

Web Title: Ratnagiri News 4.5 cores robbery gang arrested