अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला यंदा आंब्याच्या ५५ ते ६० हजार पेट्या वाशीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

रत्नागिरी - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला दरवर्षी एक लाखाहून अधिक आंबा पेट्या वाशी मार्केटला रवाना होतात. निसर्गाची साथ न मिळाल्याने यावर्षी ५५ ते ६० हजार पेट्या कोकणातून रवाना झाल्या आहेत.

रत्नागिरी - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला दरवर्षी एक लाखाहून अधिक आंबा पेट्या वाशी मार्केटला रवाना होतात. निसर्गाची साथ न मिळाल्याने यावर्षी ५५ ते ६० हजार पेट्या कोकणातून रवाना झाल्या आहेत. हंगाम सुरू झाल्यानंतर सव्वा महिन्यात वाशीमध्ये बारा लाख पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधून पाठविण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण पन्नास टक्‍केच आहे. आवक घटल्याने अक्षय्य तृतीयेला दर चढेच असून सामान्य ग्राहकाच्या आवाक्‍याबाहेर आहेत.

नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये १५० ते ५०० रुपयांपर्यंत मिळणारा आंबा यावर्षी डझनाला ३०० ते ९०० रुपये घाऊक बाजारात विकला जात आहे. किरकोळ बाजारात तो ५०० ते १५०० च्या घरात आहे. त्यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक ५० टक्‍क्‍यांनी घटल्याने सोन्याच्या दरात आंबा विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. गतवर्षी आवक वाढल्याने पेटीचा दर गडगडला होता. तेव्हा बाजारात पेटी दोन हजार रुपयांहून कमी किमतीत विक्रीला जात होती. वाशीत हापूसची सव्वा महिन्यात १२ लाख २ हजार ३३६ पेट्यांची तर कर्नाटक हापूसची ३ लाख ८ हजार ६२९ पेट्यांची आवक झाली.

मुहूर्तासाठी आदल्या दिवशी मंगळवारी हजार २६७ पेट्या हापूस आंब्यांची आवक झाली. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील हापूस आणि कर्नाटकमधील आंब्याच्या मिळून दरवर्षी सव्वा लाख पेट्यांची आवक होते. यंदा नेमकी उलटी परिस्थिती आहे. आंब्याचे उत्पादन घटल्याने आवक ५० टक्क्‍यांवर आली आहे. यामुळे आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत.

काही ठिकाणी फळ गळ
चिपळूणसह काही तालुक्‍यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वादळामुळे तयार आंबा गळून गेला; मात्र त्यानंतर तापमान काही भागांमध्ये ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत गेले. कातळावरील आंब्याला हे तापमान त्रासदायक ठरत आहे. उन्हामुळे आंबा भाजला जात असून काही ठिकाणी फळ गळ होत असल्याचे बागायतदारांनी सांगितले.

आंबा अत्यंत कमी आहे. वाशीत पन्नास टक्‍केच आंबा पाठविला जात आहे. कोकणाबरोबरच कर्नाटकमधूनही आंबा कमी आहे. त्यामुळे चांगल्या आंब्याला दर टिकून आहे.
- डॉ. विवेक भिडे,
बागायतदार
 

Web Title: Ratnagiri News 60 thousand Mango boxes in Washi Market