शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण देण्यासंदर्भात सामंत यांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

राजेश कळंबटे
शुक्रवार, 11 मे 2018

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिकांना सत्तर टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. ही प्रक्रिया राबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत यावर तोडगा काढू असे श्री. तावडे यांनी सांगितले.

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत स्थानिकांना सत्तर टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. ही प्रक्रिया राबविण्यासाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत यावर तोडगा काढू असे श्री. तावडे यांनी सांगितले. विधानपरिषद निवडणुकी नतर बीएड, डीएड धारकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे आमदार सामंत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे डीएड, बीएड बेरोजगार संघटनचेचे पदाधिकार्‍यांचे एक दिवसीय आंदोलन होते. आंदोलनकर्त्यांना आमदार सामंत, जिल्हापरिषद शिक्षण सभापती दीपक नागले, नगराध्यक्ष राहूल पंडित, संजू साळवी, शिक्षक संघटनेचे प्रभाकर खानविलकर, श्री. काजवे यांनी भेट दिली आणि समस्या जाणून घेतल्या.

आमदार सामंत यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी दुरध्वनीवरुन आंदोलनकर्त्यांचे प्रश्‍न मांडले. त्यावर तोडगा काढण्याबाबत विनंती केली. आमदारांच्या शिष्टाईमुळे श्री. तावडे यांनी थेट संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत स्थानिकांचाच समावेश करण्यात कायदेशीर अडथळे आहेत. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री यावर तोडगा काढू शकतील, असे तावडेंनी सांगितले. ही चर्चा झाल्यानंतर आमदार सामंत यांनी त्यांचा प्रश्‍न तडीस नेऊ असे आश्‍वासन दिले. तसेच आंदोलन सोडण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला संघटनेकडूनही मान देण्यात आला.

या आहेत मागण्या

  • धोरणात्मक बदल करून आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना सत्तर टक्के आरक्षण मिळावे.
  • प्रलंबित शिक्षक भरतीत रत्नागिरीतील रिक्त जागा एकत्रितरीत्या भराव्यात,
  • जिल्हा बदल्यांमुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक डीएड्, बीएड धारकांना प्राधान्य दयावे.
  • त्यासाठी काढलेल्या शासन परिपत्रकाचा शिक्षक भरतीत अवलंब व्हावा आणि शिक्षक भरतीत गुण वाढवून देणार्‍या रॅकेटवर कारवाई करावी 
Web Title: Ratnagiri News 70 percent reservation in Teachers recruitment