अमेरिकेला ७७ मेट्रिक टन हापूस निर्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

रत्नागिरी - दर्जेदार आंबा उपलब्ध नसल्याने मार्चअखेरपर्यंत हापूसची निर्यात सुरू झाली नव्हती. परंतु आठवडाभरापूर्वी अमेरिकेला हापूसची निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथून ७७ मे. टन हापूस अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे

रत्नागिरी - दर्जेदार आंबा उपलब्ध नसल्याने मार्चअखेरपर्यंत हापूसची निर्यात सुरू झाली नव्हती. परंतु आठवडाभरापूर्वी अमेरिकेला हापूसची निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथून ७७ मे. टन हापूस अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे. यावर्षी युरोपीय युनियनच्या सदस्य देशांमध्ये हापूसची निर्यात करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. यावर्षी ५० हजार टनांहून अधिक आंबा पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतून सर्वाधिक आंबा वाशी मार्केटला जातो. वाशीतून अनेक देशांमध्ये आंब्याची निर्यात केली जाते. वाशीत पणन महामंडळाने नवीन रेडिएशन प्लॅंट उभारला आहे. या प्लॅंटमध्ये आंब्यावर प्रक्रिया केली जाते. अमेरिकेसह अनेक देशातील निर्यातदार वाशीत उपलब्ध असतात. प्रत्येक देशाच्या मागणीनुसार आंब्यावर प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. यापूर्वी वाशी येथील आंबा नाशिक येथे प्रक्रियेसाठी पाठविला जात होता. वातावरणातील बदल, ओखी वादळामुळे हापूसच्या दर्जावर परिणाम झाला आहे. मागणीपेक्षा आंब्याचे उत्पादन कमी आहे. आंबा भाजण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वाशीत आलेला आंबा अनेक वेळा खराब असतो. 

निर्यात ठप्प 
युरोपमध्ये आंबा निर्यातीसाठी आवश्‍यक असलेल्या उष्णजल प्रक्रियेचा अहवाल ‘अपेडा’कडून ‘एनपीपीओ’कडे पाठविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत याबाबत ‘एनपीपीओ’ने कोणताच निर्णय घेतलेला नाही. युरोपने मान्यता दिलेल्या उष्णजल प्रक्रियेनुसार दिलेल्या तापमानात हापूसच्या दर्जावर परिणाम होत आहे. यासाठी ४७ अंश सेल्सिअस तापमानात ५० मिनिटे आंबा ठेवून संशोधन करण्यात आले. त्याचा नवा अहवाल तयार करून ‘एनपीपीओ’कडे पाठविला आहे. परंतु मान्यता न मिळाल्याने यंदा हापूसची रत्नागिरीतून निर्यात ठप्प झाली आहे.

Web Title: Ratnagiri News 77 Metric Ton Hapus Export to America