आरे - वारे किनारी सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना

राजेश कळंबटे
सोमवार, 4 जून 2018

रत्नागिरी - आरे-वारे किनार्‍यावर बोरिवलीतील कुटूंब बुडाल्यानंतर जिल्हाप्रशासनाकडून किनारी सुरक्षेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. तातडीच्या बैठकीमध्ये पाच जीवरक्षक नेमण्यासह वॉच टॉवर, बचावाचे साहित्य आणि सुर्यास्तानंतर पोहण्यास मनाईचा निर्णय घेतला आहे; मात्र ऑक्टोबर 2017 ला पाच तरुण बुडाल्यानंतर सहा महिन्यात प्रशासनाकडून जीवरक्षक का नेमले नाहीत, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

बोरीवलीतील डीसोझा कुटूंबातील पाच सदस्य काल (ता. 3) आरे-वारे समुद्रात बुडून मृत पावले. पावसाळी वातावरणामुळे समुद्र खवळला असून ओहोटीच्यावेळी पोहणार्‍यांना पाणी आतमध्ये खेचून घेते. याठिकाणी खाडीचे मुख असल्याने पाण्यालाही प्रचंड करंट आहे. त्यात उत्साही पर्यटक जीव धोक्यात घालतात. या घटनेनंतर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी तातडीने बैठक घेतली. मेरीटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पर्यटन विकास महामंडळ, जिल्हापरिषद, आपत्ती व्यवस्थापन विभाग यासह सर्व खात्याच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. साधकबाधक चर्चा केल्यानंतर यावर तोडगा काढण्यात येणार आहे. आरे-वारेत तातडीने पाच जीवरक्षक नेमले जाणार आहेत. त्याची सर्व जबाबदारी जिल्हापरिषद ग्रामविकास विभागाकडे सोपविण्यात आली आहे. चौदावा वित्त आणि कोकण ग्रामीण पर्यटन विकासमधून निधी दिली जाणार आहे.

किनारे सुरक्षेसाठी 2005 ला बनविलेल्या यादीत आरे-वारेचा समावेश नव्हता. गेल्या काही वर्षात हा बीच पर्यटनासाठी पुढे आला. येथे सुरक्षेसाठी उपाय केलेले नव्हते. सध्या वारंवार दुर्घटना घडत असून गेल्यावर्षी पाच तरुणांचा येथे बुडून मृत्यू झाला होता. भरती-ओहोटीच वेळापत्रक लावणे, धोकादायक किनारा असा फलक लावणे, यापुर्वी मृत व्यक्तींचा आकडा फलकावर जाहीर करणे यासारख्या उपाययोजना करुन पर्यटकांचा जीव सुरक्षीत ठेवण्यात येणार आहे. 

- अभिजित घोरपडे,  निवासी उपजिल्हाधिकारी 

दुर्घटनेच्या सखोल चाैकशीचेही आदेश
आरे-वारे येथे ओहोटीच्यावेळी दुर्घटना घडतात; मात्र त्याची सखोल चौकशी करुन तांत्रिक अहवाल तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मेरी टाईम बोर्ड आणि पोलीसांना दिले आहेत.

Web Title: Ratnagiri News Aare - ware sea beach security