पत्नीने थांबवले अन्‌ अमोलचे प्राण वाचले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

संगमेश्‍वर - धामणीतील अपघातात चालक आश्‍चर्यकारकरीत्या बचावला. यातील मृत प्रमिला बेर्डे यांचा मुलगा अमोलही वाचला. त्याचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. मी अपघातात सापडलो नाही, मात्र आई, बहीण आणि भाच्याला मुकलो, अशी खंत व्यक्‍त करत त्याने दुःखाला वाट मोकळी करून दिली.

संगमेश्‍वर - धामणीतील अपघातात चालक आश्‍चर्यकारकरीत्या बचावला. यातील मृत प्रमिला बेर्डे यांचा मुलगा अमोलही वाचला. त्याचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. मी अपघातात सापडलो नाही, मात्र आई, बहीण आणि भाच्याला मुकलो, अशी खंत व्यक्‍त करत त्याने दुःखाला वाट मोकळी करून दिली.

लांजातील अमोल पद्माकर बेर्डे हे त्यांची बहीण तुजा पाटणे आणि भाचा पीयूष यांच्यासह घरगुती कामासाठी नवी मुंबईतून लांजात आले होते. आज सकाळी मुंबईला ते आई प्रमिलासोबत निघाले. त्यांच्याबरोबर अमोलही मुंबईला जाणार होता. मात्र आज वटपौर्णिमा असल्याने दुपारनंतर जा, असा आग्रह त्यांच्या पत्नीने धरल्याने तो घरीच थांबला. दोन तासांनी अपघाताची खबर आली आणि सारेच सुन्न झाले. अमोल घटनास्थळी आल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. सर्व मृत संगमेश्‍वरमधील व्यापारी संदेश कापडी यांचेही नातेवाईक आहेत. त्यांच्यामुळेच अपघातग्रस्तांची माहिती व तिघांची नावे पोलिसांना समजली.

दोन वर्षांपूर्वीही कोसळली होती गाडी
ज्या ठिकाणाहून ही गाडी कोसळली, त्याच जागेवरून दोन वर्षांपूर्वी एक गाडी नदीत कोसळली होती. त्या गाडीत पाचजण होते. त्यावेळी पाणी कमी असल्याने ते बचावले होते.

गाडी शोधताना तिघे जखमी
नदीपात्रात कोसळलेली गाडी स्थानिक बाळू बसवणकर, रमेश बसवणकर व अन्य एकाने शोधली. रमेशने गाडी शोधली. गाडी काढताना तिघांच्या पायाला दुखापत झाली. पोहताना त्यांच्या पायाला गाडी लागली. त्यानंतर अंदाज घेऊन गाडी बाहेर काढली. राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी मदत केली. कोस्टगार्ड पथक, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक उपस्थित होते. आमदार साळवी दुपारी एक वाजल्यापासून गाडी बाहेर काढेपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते.

Web Title: Ratnagiri News accident in Lanja special story