मातेने घेतलेले ऋण मुलाने फेडले ७९ वर्षांनंतर

मकरंद पटवर्धन
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - स्वातंत्र्यपूर्व काळात वैद्यकीय शिक्षणासाठी आईने अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाकडून घेतलेली परतफेड शिष्यवृत्ती त्यांच्या मुलाने अलीकडे फेडून मातृप्रेम दाखवले.

रत्नागिरी - स्वातंत्र्यपूर्व काळात वैद्यकीय शिक्षणासाठी आईने अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाकडून घेतलेली परतफेड शिष्यवृत्ती त्यांच्या मुलाने अलीकडे फेडून मातृप्रेम दाखवले. ७४ वर्षांच्या या मुलाचे नाव आहे श्रीकांत त्रिंबक बापट. नागपूर येथून खास परतफेड आणि मंडळाच्या चोख कारभाराबद्दल देणगी देण्याकरिता ते येथे आले होते.

बापट यांनी मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांची भेट घेतली. मंडळाचे कामकाज पाहून अकरा हजार रुपये आणि ९० हजार रुपयांची देणगी दिली. मंडळाने मुलींसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचेही त्यांनी कौतुक केले.

आमचे बालपण, गतवैभव, आईच्या आठवणी जाग्या झाल्या. माता-पित्यांचे हे ऋण फेडणे आम्हाला या जन्मी शक्‍य नाही; पण आईवर असलेले आर्थिक ऋण अंशत: भरून काढण्याची छोटीशी संधी मला मिळाली.
- श्रीकांत बापट,
नागपूर

श्री. बापट यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, माझ्या आईने (कै.) डॉ. सौ. लीला बापट यांनी १९३८ च्या दरम्यान वैद्यकीय शिक्षणासाठी ९६० रुपये चित्पावन मंडळाकडून परतफेड शिष्यवृत्ती म्हणून घेतले. तिचे ३५ व्या वर्षी गंभीर आजाराने १९५५ मध्ये निधन झाले. आई गेली तेव्हा मी ११ वर्षे, भाऊ विनय ६ वर्षे, मोहन ३ वर्षे व सतीश दीड वर्षाचा होता. माझी आई थोर क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचे चुलत भाऊ गणेश विनायक चाफेकर यांची नात. तिचे शिक्षण हुजूर पागेत झाले.

आईचे सुतिकागृह व वडिलांचा दवाखाना होता. पत्नीच्या वियोगाने वडिलांनी सुतिकागृह, दवाखाना, गाडी, घर येईल त्या किमतीत विकले. नंतर विदर्भ, मध्य प्रदेशात आम्ही रवाना झालो. वडिलांचे मन कुठेही न रमल्याने दर सहा महिन्यांनी गाव बदलले. पाचवी ते दहावीपर्यंत माझ्या ९ शाळा बदलल्या. सुदैवाने आम्ही सर्वजण फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे राखेतून जन्म घेतला व प्रत्येक भावंडाने उच्च शिक्षण पूर्ण केले.

बापट म्हणाले की, जुनी कागदपत्रे चाळताना आईने घेतलेल्या परतफेड शिष्यवृत्तीबद्दल माहिती मिळाली. परतफेड करता आली नसल्याने मला फार वाईट वाटले. चित्पावन मंडळ आहे का, शिष्यवृत्तीची नोंद मिळेल का, अशा अनेक शंका मनात होत्या. पण मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला. संस्थेच्या चोख कारभारामुळे परतफेड शिष्यवृत्तीची नोंद सापडली. अन्य भावांनीही त्याला संमती दिली.

Web Title: Ratnagiri News After 79 years child paid loan take by mother