सांगा आम्ही जगायचं तरी कसं...नांदिवडे ग्रामस्थांचा सवाल

राजेश कळंबटे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

नांदिवडे ग्रामस्थांनी जेएसडब्लू एनर्जी आणि पोर्ट विरोधात सलग दुसर्‍या दिवशी ग्रामपंचायतीपुढे बेमुदत आंदोलन सुरुच ठेवले. शुक्रवारी (ता. 16) दिलेल्या लेखी पत्रातही ठोस आश्‍वासनं कंपनीकडून मिळालेली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना माघारी धाडले.

रत्नागिरी - आठ ते दहा वर्षाहून अधिक वर्षे काम कंपनीत काम करत आलो. तरी ना पगारवाढ, ना कायम करण्याच्या हालचाली. कोळशामुळे निर्माण झालेल्या राखेने बागायतीचे नुकसान झाले. बंदर परिसरात मासेमारीला मनाई केली जाते. त्याचा मोबदलाही देण्यास जेएसडब्ल्यू तयार नाही. मग आम्ही जगायचं कसं, असा सवाल करित नांदीवडे ग्रामस्थांनी जेएसडब्लू एनर्जी आणि पोर्ट विरोधात सलग दुसर्‍या दिवशी ग्रामपंचायतीपुढे बेमुदत आंदोलन सुरुच ठेवले. शुक्रवारी (ता. 16) दिलेल्या लेखी पत्रातही ठोस आश्‍वासनं कंपनीकडून मिळालेली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना माघारी धाडले.

अशा आहेत नांदिवडे ग्रामस्थांच्या मागण्या....

 • धामणखोल बंदरात गळाने मासेमारी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वांना परवानगी देणे
 • कोळसा आणि अ‍ॅश पावडर उघड्यावर ठेवल्यामुळे हवेतून त्याचे कण कुणबीवाडी, नांदिवडे परिसरातील घरांवर आणि फळझाडांवर पडतात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
 • स्थानिक ग्रामस्थांकडे कस्टम क्लिअरन्स लायसन्स आहे. त्यांना क्लिअरन्स कामे तत्काळ द्यावीत.
 • लेबर कॉलनीतील सांडपाणी उघड्यावर साठवले जाते. ते गावामध्ये येऊन रोगराई पसरू शकते. त्याची त्वरित विल्हेवाट लावावी.
 • आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी
 • कंपनीत कार्यरत असलेल्या स्थानिकांना त्वरित कायम करावे
 • ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जमीन गेलेल्या शेतकर्‍यांच्या कबिल्यातील किमान एकाला रोजगार उपलब्ध करून द्यावा
 • अंबुवाडी घाटमाथ्यावरील अ‍ॅश पॉडमधील अ‍ॅश उचलणे
 • कामाचे वाटप करताना स्थानिकांनाच प्राधान्य देणे
 • लेबर कॉलनीत बंदिस्त कंपाऊंड बांधणे
 • स्थानिक कामगारांच्या वेतनात वाढ करणे

कुलिंग टॉवरमधून बाहेर पडणार्‍या खार्‍या पाण्यामुळे कुणबीवाडी, नांदिवडे परिसरातील ग्रामस्थांच्या डिश टिव्ही अँटेना, विद्युत जोडणीच्या जीआय तारा गंजल्या आहेत. अशा अनेक समस्यांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनी विरोधात आंदोलन छेडले आहे.

नांदिवडे ग्रामपंचायत समोरील जागेत जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात हे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणात नांदिवडे सरपंच दिशा हळदणकर, उपसरपंच स्नेहल चौगुले, निकिता वणके, शरयू कोळंबेकर, माजी सरपंच अमित गडदे, महेंद्र गडदे, रवींद्र गडदे यांच्यासह अन्य ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत. माजी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू पाटील यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

Web Title: Ratnagiri News agitation against JSW energy in Nandivade