राज्य, देशाचीही कंगाल होण्याकडे वाटचाल - अनंत गाडगीळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सावर्डे - देशात आणि राज्यात जनतेची दिशाभूल करून एनडीए सरकारने सत्ता काबीज केली. ऑनलाईनची काडीमात्र माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना ६६ प्रश्‍न ऑनलाईनमध्ये कसे भरता येतील, बुलेट ट्रेनच्या सात स्थानकांमधील दोन महाराष्ट्रात, बाकीचे गुजरातमध्ये; तरीही महाराष्ट्राने ५० टक्के खर्च द्यायचा.

सावर्डे - देशात आणि राज्यात जनतेची दिशाभूल करून एनडीए सरकारने सत्ता काबीज केली. ऑनलाईनची काडीमात्र माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना ६६ प्रश्‍न ऑनलाईनमध्ये कसे भरता येतील, बुलेट ट्रेनच्या सात स्थानकांमधील दोन महाराष्ट्रात, बाकीचे गुजरातमध्ये; तरीही महाराष्ट्राने ५० टक्के खर्च द्यायचा.

अर्थसंकल्पात ३० टक्के कपात, सरकारने भारतीय स्टेट बॅंकेच्या कर्जाचे ४ लाख ११ हजार कोटीचे व्याज भरायचे आहे. ओव्हर ड्राफ्ट घेण्याची वेळ सरकारवर आली आहे. देश आणि राज्याला भिकेकंगाल केल्याची ही लक्षणे आहेत, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली.

येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गाडगीळ म्हणाले की, ‘‘नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, शिक्षणाचे खाजगीकरण, अशा अनेक क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले. त्यामुळे कोणतीही समस्या मार्गी लागली जात नाही. लोकशाहीतील न्याय व्यवस्थेवर अविश्‍वास दाखवून सरन्यायाधीशांच्या विरोधात चार न्यायाधीशांनी केलेले बंड ही देशाच्या इतिहासात निंदनीय व लाजीरवाणी घटना आहे.

सरकारने त्यावर एकही शब्द काढलेला नाही. कोणतेही व्हिजन नसल्याने देश अधोगतीला चालला आहे. राज्यातील ८० हजार शाळा बंद करून शिक्षण क्षेत्रात खासगीकरणाचे धोरण राबविले जात आहे. सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात झाल्या. त्याला सरकारच जबाबदार आहे. प्रशासनावर अंकुश नाही, त्यामुळे अधिकारी जनतेला वेठीस धरत आहेत. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात २.५ टक्के उत्पादन वाढ आणि महागाई ५० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. गेल्या १५ वर्षात राज्याला उत्पन्नात व विकासाच्या बाबतीत देशात पहिल्या स्थानावर नेऊन ठेवले होते. तो महाराष्ट्र ९ व्या क्रमांकावर गेला आहे.’’

सावर्डे येथे गाडगीळ यांचे शेखर निकम यांनी स्वागत केले. पत्रकार परिषदेनंतर स्वर्गीय गोविंदरावजी निकम स्मारक व वस्तूसंग्रहालयास त्यांनी भेट दिली. सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतीचे त्यांनी कौतुक केले.

Web Title: Ratnagiri News Anant Gadgil comment