अणुस्कुरा घाटरस्ताही लवकरच चौपदरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

राजापूर - राजापूर तालुक्‍यासह अन्य भागांतील गावांना घाटमाथ्यासह पश्‍चिम महाराष्ट्राला शॉर्टकटने जोडणाऱ्या ओणी-अणुस्कुरा घाटातील रस्त्याचेही लवकरच चौपदरीकरण होणार आहे. या मार्गावरील ओणी-अणुस्कुरा-कोल्हापूर-विटा (जि. सांगली) या मार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित असल्याची माहिती माजी आमदार गणपत कदम यांनी दिली. 

राजापूर - राजापूर तालुक्‍यासह अन्य भागांतील गावांना घाटमाथ्यासह पश्‍चिम महाराष्ट्राला शॉर्टकटने जोडणाऱ्या ओणी-अणुस्कुरा घाटातील रस्त्याचेही लवकरच चौपदरीकरण होणार आहे. या मार्गावरील ओणी-अणुस्कुरा-कोल्हापूर-विटा (जि. सांगली) या मार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित असल्याची माहिती माजी आमदार गणपत कदम यांनी दिली. 

तालुक्‍याचा पूर्व भाग असलेला पाचल परिसर सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला असून या पाचल परिसरातून राजापूर तालुका घाटमाथ्याशी जोडला गेला आहे. घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सातारा, सांगली आदी भागांमध्ये जा-ये करण्यासाठी काही वर्षांपूर्वी अणुस्कुरा घाटातून रस्ता तयार करण्यात आला आहे.

अणुस्कुरा घाटातील मार्गाच्या चौपदरीकरणामुळे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र अधिक जवळ येणार असून त्यातून या दोन्ही परिसरांतील विकासाला चालना मिळणार आहे.
- गणपत कदम,
माजी आमदार

या व्यतिरिक्त घाटमाथ्यावर जाण्यासाठी सिंधदुर्ग जिल्ह्यातून पुढे गगनबावडा-कोल्हापूर आणि दुसरा लांजा-साखरपामार्गे कोल्हापूर असे दोन पर्यायी मार्ग राजापूरवासीयांसाठी आहेत. मात्र, या दोन्ही मार्गांच्या येथून जा-ये करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक असून वेळेचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे अन्य मार्गांच्या तुलेनत शॉर्टकट म्हणून ओळखल्या जात असलेल्या राजापूर ओणी-अणुस्कुरा मार्गाचा वाहनचालकांकडून उपयोग केला जातो.

या मार्गावर वाहनांची नियमितपणे वर्दळ असते. तालुक्‍यामध्ये ठिकठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारामध्ये घाटमाथ्यावरील व्यापारी मोठ्या संख्येने अणुस्कुरामार्गे येतात. कोल्हापूर येथे घाऊक बाजारपेठेमध्ये खरेदी-विक्रीसाठी जा-ये करणारे येथील स्थानिक व्यापारीही अणुस्कुरा मार्गाचा अवलंब करतात. 

डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या नागमोड्या वळणाच्या अणुस्कुरा घाटातून पावसाळ्यामध्ये प्रवास करणे अनेक वेळा जोखमीचे ठरते. रस्त्यानजीकच्या धोकादायक दरडी पावसाळ्यामध्ये कधीही कोसळून अपघात होण्याची, तर काही वेळा अचानक रस्ता बंद होण्याची भीती असते ही समस्या चौपदरीकरणानंतर बरीचशी दूर होईल.

 

Web Title: Ratnagiri news Anuskura Ghat Road four track