‘भिक्षामुक्‍त मुलांचा देश’ बनविण्यासाठी आशीष चालतोय

‘भिक्षामुक्‍त मुलांचा देश’ बनविण्यासाठी आशीष चालतोय

रत्नागिरी - एकट्याने चालून काय होईल... याला शासन जबाबदार आहे... अशा प्रतिक्रिया झेलत दिल्लीचा तरुण इंजिनिअर आशीष शर्मा पदयात्रा करत रत्नागिरीत दाखल झाला.

‘भिक्षामुक्‍त मुलांचा देश’ हे स्वप्न घेऊन तो जम्मूतील उधमपूर येथून निघाला आहे. चलने से बदलाव आयेगा... गांधीजी, पटेल, स्वामी विवेकानंद यांनी याच मार्गावर चालत यश मिळवले, असे म्हणत आशीषने आतापर्यंत साडेआठ लाख लोकांना भिक्षामुक्‍तचा संदेश दिला. भगतसिंगांच्या घरापासून सुरू केलेल्या पदयात्रेचा शेवट डॉ. अब्दुल कलाम यांच्या घराजवळ करणार आहे.

भीक मागण्यापासून मुलांना परावृत्त करण्यासाठी दिल्लीचा तरुण इंजिनिअर आशीष शर्मा चालतो आहे. शंभर कोटी भारतीयांनी भीक देणे बंद करा, देशातील प्रत्येक मुलगा शाळेत जाऊ शकेल, असा संदेश तो देतो. रत्नागिरीत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व काही शाळांना भेट दिली. एखादा तरुण दिसला की आशीष त्याच्यापुढे भिक्षामुक्‍तसाठी तरुणांची कामगिरी याचा पाढा वाचतो. हातात भारतीय झेंडा घेऊन चालणाऱ्या आशीषच्या चेहऱ्यावर वेगळे करत असल्याचा आनंद दिसतो. अनेकांनी तर सेल्फी काढून ते व्हायरल केले.

मोठ्या शहरात सकाळी रस्त्यावर भीक मागणारी लहान मुले दिसतात. बरेच लोक त्यांना पैसे देतात, काही लोक तसे न करण्यास बजावतात आणि पुढे जातात. आशीष यापेक्षा वेगळा. दिल्लीत शिक्षण घेताना एक नऊ वर्षाचा मुलगा भीक मागताना आढळाला. तो ड्रग्ज घेत असल्याचे आढळले. त्याला आई-वडिलांचा पत्ताही माहिती नव्हता. त्या मुलाला आपल्याजवळ ठेवून घेतले. त्याला ड्रग्जपासून मुक्त केले. आठ मुलांचा त्याने सांभाळ केला. त्या मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्यासाठी लढा उभारण्याची गरज लक्षात आल्यावर वार्षिक पाच लाखाची नोकरी सोडून आशीषने २२ ऑगस्टपासून पदयात्रा सुरू केली. मुले भिक्षामुक्‍त झाली तर त्यांना ड्रग्जपासून बाजूला ठेवता येईल. १४ जून २०१८ ला प्रत्येक भारतीयाने भिक्षामुक्‍तीसाठी शपथ घेतली पाहिजे, असे तो सांगतो.

मदतीसाठी ‘ॲप’ 
पाच किलोमीटरच्या त्रिज्येमधील कोणत्याही मुलाची माहिती अपलोड करता येईल असे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्याआधारे आसपासचे पोलिस अधिकारी आणि अनाथालय मुलाला मदत करू शकतील, असे आशीषने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com