रेशन दुकानदारांना 150 रुपये कमिशन मिळालेच पाहिजे - अशोक कदम

मकरंद पटवर्धन
रविवार, 27 मे 2018

रत्नागिरी - जिल्ह्यात इंटरनेट, वायफाय सुविधेअभावी पॉस मशिनद्वारे धान्य वितरण खोळंबले आहे. यात दुकानदारांचे 70 रुपये कमिशन कापतात. परंतु सर्व म्हणजे 150 रुपये कमिशन मिळालेच पाहिजे. मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावू. मात्र तोडगा न निघाल्यास पावसाळी अधिवेशनात धडक मारू, असा इशारा रत्नागिरी जिल्हा धान्य व केरोसीन चालक-मालक संघटनेच्या आनंद मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिला.

दैवज्ञ भवन येथे मेळावा झाला. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, शासन या घोळामुळे ग्राहकांनाही धान्य वेळेवर मिळत नाहीये. पुरवठा अधिकारी श्री. फड यांनी मला दूरध्वनीवरून उद्या दुपारपर्यंत नेट नसलेल्या रेशन दुकानांची यादी जाहीर करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्या ठिकाणी पावती करून धान्य वितरण करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

या वेळी तालुकाध्यक्षांनी प्रत्येक तालुक्याची स्थिती सांगितली. सर्वांनी नेट कसे मिळत नाही, ग्राहकांना कशी उत्तरे द्यावी लागतात याचा पाढा वाचला. रेंज नसेल तर दुसर्‍या ठिकाणी जा तिथे पावत्या करा व दुसर्‍या दिवशी धान्य वितरण करा, अशा सूचना शासनाकडून येतात. प्रत्यक्षात हे शक्य नसल्याचे सर्वच तालुकाध्यक्षांनी सांगितले.

व्यासपीठावर सचिव प्रकाश आग्रे, अनंत केंद्रे, महेश साबळे, संतोष उतेकर, विजय राऊत, शशिकांत दळवी, उल्हास देसाई हे सर्व तालुकाध्यक्ष आबा टिळेकर, रमेश राजे, समाधान संसारे, अविनाश येसरे, योगेश शिंदे, प्रताप घोसाळकर, श्री. देऊडकर आदी उपस्थित होते. 

दापोली तालुका डोंगराळ व अतिदुर्गम आहे. 17 ठिकाणी नेटवर्क नाही. काही ठिकाणी एक पावती झाली की दुसरी करण्यासाठी दीड-दोन तास वाट पाहावी लागते. यात ग्राहकांच्या शिव्या आम्हाला खाव्या लागत आहेत.

-  रमेश राणे

Web Title: Ratnagiri News Ashok Kadam comment