रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष वालम यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

रत्नागिरी - ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत घेतलेल्या बैठकीत एजंटला बेदम मारहाण केल्याच्या आरोपाखाली रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम व त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली. राजापूर, नाटे आणि स्थानिक गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. यामुळे राजापूरातील रिफायनरीविरोधातील संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे. 

तालुक्‍यातील कुंभवडे हायस्कूलमध्ये रविवारी (ता. 14) रिफायनरी संदर्भात काही प्रकल्पग्रस्तांची बैठक सुरू होती. या बैठकीला कोकण विनाशकारी रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यासह अन्य काही मंडळी उपस्थित होती. बैठकीमध्ये श्री. वालम हे पंढरीनाथ आंबेरकर दलाली करतात, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात असे सांगत होते. त्याबाबत बैठकीत त्यांनी जाब विचारला. या रागातून श्री. वालम, पत्नी आणि अन्य काही लोकांनी डोक्‍यात खुर्ची घालून लाथाबुक्‍क्‍यांनी मारून ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर यांनी राजापूर पोलिसांकडे दिली होती.

तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी अशोक वालम, पत्नी आणि अन्य काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी वालम यांच्यासह काही ग्रामस्थांनी नाटे पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. कुंभवडे येथे बैठक सुरू होती. तेव्हा सभेत घुसून आपल्या पतीला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी पंढरीनाथ आंबेकर व अन्य काहींनी दिल्याबद्दल परस्परविरोधी तक्रार वालम यांच्या पत्नीने दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत कोकण विनाशकारी रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम, पत्नी व अन्य काहींना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष सासने यांनी याला दुजोरा दिला. 

Web Title: Ratnagiri news Ashok walam arrested

टॅग्स