कोकण पर्यटन विकासात रस्त्यांचा ‘गतिरोधक’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मंडणगड - पर्यटन विकासाच्या मार्गावर असलेल्या दापोली व मंडणगड तालुक्‍यांना केळशी-मंडणगड मार्गावर सुरू असलेल्या गौणखनिज वाहतुकीचा फटका बसत आहे. रस्त्यांची क्षमता नसतानाही अवजड वाहने देव्हारे ते खेड मार्गावर जात असल्याने नुकत्याच डागडुजी केलेल्या तालुक्‍यातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळेच याचा फटका दापोली, मंडणगडमधील पर्यटनावर होण्याची भीती आहे. 

मंडणगड - पर्यटन विकासाच्या मार्गावर असलेल्या दापोली व मंडणगड तालुक्‍यांना केळशी-मंडणगड मार्गावर सुरू असलेल्या गौणखनिज वाहतुकीचा फटका बसत आहे. रस्त्यांची क्षमता नसतानाही अवजड वाहने देव्हारे ते खेड मार्गावर जात असल्याने नुकत्याच डागडुजी केलेल्या तालुक्‍यातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळेच याचा फटका दापोली, मंडणगडमधील पर्यटनावर होण्याची भीती आहे. 

रस्त्यांची चाळण झाल्याने एकदा आलेला पर्यटक पुन्हा या तालुक्‍यांकडे येण्याचे टाळत आहे. पावसाळ्यात गणपतीवेळी खड्डे भरणे अपेक्षित असताना ते डिसेंबरमध्ये भरले गेले. त्यामुळे दोन्ही तालुक्‍यांत पर्यटक म्हणावे तसे आले नाहीत. आता केळशी (रोवले), साखरी येथील गौणखनिज मालवाहतुकीकरिता रोवले, साखरी ते बेळगाव असा लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी चौदा चाकी अवजड वाहनांचा वापर केला जात आहे. या रस्त्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू राहिल्यास अल्पावधीतच रस्त्यांची चाळण होणार आहे. त्यामुळे येत्या पावसामध्ये पुन्हा तालुकावासीयांच्या पदरी खड्ड्यांतील प्रवास शिल्लक राहणार आहे. 

एक नजर...

  •  मंडणगड, दापोलीतील पर्यटनावर परिणाम

  •  नऊ टन मर्यादेच्या रस्त्यावरून पंचवीस ते तीस टनांची वाहतूक

  •  चौदाचाकी वाहनांचा वापर

  •  दरदिवशी सुमारे ५० अवजड वाहनांची ये-जा 

बाणकोट-पंढरपूर व रोवले, साखरी चिंचाळी हा रस्ता मुळातच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तयार केलेला नाही. हा रस्ता प्रतिएक्‍सेल नऊ टन माल वाहून नेण्यासाठी बनवलेला आहे. मंडणगड ते रोवले, साखरी हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठीच एक पदरी असल्याने यावर अवजड लांब वाहनांना बंदी असतानाही दररोज सुमारे पन्नास अवजड वाहने ये-जा करतात.

प्रतिएक्‍सेल ९ टनाची मर्यादा असताना या चौदाचाकी गाड्यांमधून क्षमतेपेक्षा अधिक पंचवीस ते तीस टन माल वाहून नेला जात आहे. यामुळे गेल्या पावसाळ्यात माल वाहून नेणारा ट्रक पाचरळ गावानजीक मुख्य डांबरी रस्त्यातच अडकून राहिला होता. गतवर्षीही अशीच वाहतूक सुरू असल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली होती. आजारी रुग्णांनाही दापोली उपजिल्हा रुग्णालयात जाण्याकरीता दोन ते अडीच तास खड्ड्यातून प्रवास करावा लागत होता.

दापोलीकरांना खेडमार्गे जादा अंतर कापून वेळ व पैसा वाया घालवत मुंबई-पुण्याला जावे लागत होते. यावर्षी या वाहतुकीवर वेळेत बंधन न घातल्यास दोन्ही तालुक्‍यांतील रस्त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे. त्याचा फटका दोन्ही तालुक्‍यांच्या पर्यटनाला बसणार आहे. 

प्रादेशिक परिवहन खात्याचे दुर्लक्ष
जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीवर नजर ठेवून असलेले प्रादेशिक कार्यालयाला अशाप्रकारे सुरू असलेल्या वाहतुकीची माहिती नाही का? अशा वाहतुकीवर कारवाई का केली गेली नाही? क्षमतेपेक्षा अधिक माल वाहणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? गौणखनिजाचा सेस निधी या रस्त्यांच्या विकासाकरिता खर्ची होत नाही. मात्र वाहतूक नियमित सुरूच आहे. याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असून मागील महिन्यात भरलेले खड्डे पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली आहे. हे असेच सुरू राहिल्यास पावसाळ्यात येथील वाहतुकीसाठी अत्यंत त्रास सहन करावा लागणार आहे.
- दिनेश साखरे,
 कुणबी सेवा संघ, अध्यक्ष

 

Web Title: Ratnagiri News bad roads affects tourism