पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी लागू

राजेश शेळके
सोमवार, 1 जानेवारी 2018

शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार महाराष्ट्र सागरी क्षेत्रामध्ये मासेमारी करण्याची त्यांची चार महिन्यांची मुदत  ३१ डिसेंबरला संपली. त्यामुळे पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी लागू झाली आहे. बंदीचा मासळी व्यवसायावर पन्नास टक्के थेट परिणाम होणार आहे.

रत्नागिरी -  जिल्ह्याचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या मासळी व्यवसायामध्ये पर्ससीननेटद्वारे होणाऱ्या मासेमारीचा मोठा हातभार आहे. सुमारे पावणेतीनशे पर्ससीनद्वारे मासेमारी होते. शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार महाराष्ट्र सागरी क्षेत्रामध्ये मासेमारी करण्याची त्यांची चार महिन्यांची मुदत  ३१ डिसेंबरला संपली. त्यामुळे पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी लागू झाली आहे. बंदीचा मासळी व्यवसायावर पन्नास टक्के थेट परिणाम होणार आहे. आर्थिक उलाढालीचा रेशो त्यामुळे ढासळणार असून जोडव्यवसाय आतबट्ट्यात येणार आहे. बारा नॉटिकल मैलबाहेर खोल समुद्रात व्हीटीएस प्रणाली बसवून ही मासेमारी करता येईल.

मासेमारी हा जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय आहे. पर्ससीन, पारंपरिक मासेमारी, रापण, छोटे व्यावसायिक आदींद्वारे मासेमारी केली जाते. याला अनुसरून बर्फ फॅक्‍टरी, जाळी विक्री व्यावसायिक, पाणी-डिझेल पुरविण्याचा व्यवसाय, खलाशी, टपरीवाले, मासे सोलणारे, विक्री करणारी आदी जोड व्यवसाय आहेत. मासळी व्यवसायावर चालणारी ही एक मोठी साखळी आहे. ओखी वादळामुळे आठ दिवस मासेमारी बंद होती. त्यामुळे सुमारे ४० कोटींच्या घरात हा व्यवसाय बुडाल्याचा मत्स्य खात्याचा अंदाज आहे.

चार वर्षांपूर्वी पारंपरिक मच्छीमार आणि पर्ससीनधारक यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि शासनाने संपूर्ण मासेमारीवर बंदी आणली. यातून आता हा व्यवसाय काहीसा सावरला आहे. नवे नियम आणि अटी घालून ही मासेमारीला शासनाने पुन्हा परवानगी दिली. 

जिल्ह्यात पर्ससीननेटद्वरे मासेमारी करणाऱ्यांची संख्या २७९ एवढी आहे. पारंपरिक, छोटे  मच्छीमारांच्या तुलनेत जास्त प्रमाणात यांच्याकडून मासेमारी होते. शासनाने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीतच पर्ससीनद्वारे महाराष्ट्र सागरी हद्दीमध्ये मासेमारी करण्याची परवानगी दिली आहे. त्यांची ही मुदत आज संपुष्टात आली. सोमवारपासून पर्ससीनद्वारे होणाऱ्या मासेमारीला महाराष्ट्र सागरी हद्दीमध्ये बंदी लागू झाली आहे. यामुळे ५० टक्के मासळी व्यवसाय बसणार हे निश्‍चित आहे. इतर जोड व्यवसायावरही त्याचा परिणाम होईल. मासळी दरामध्येही वाढ होण्याची शक्‍यता आहे. शासनाने याला पर्याय दिला असून व्हीटीएस यंत्रणा बसविणाऱ्या पर्ससीनधारकांना १२ नॉटिकल मैल बाहेर मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. 

पर्ससीननेटद्वारे होणाऱ्या मासेमारीला ३१ डिसेंबरनंतर महाराष्ट्र सागरी हद्दीमध्ये मासेमारी करण्यास बंदी लागू झाली आहे. बंदीमुळे मासळी उत्पादनावर ५० टक्के परिणाम होणार आहे. मात्र, त्यांना १२ नॉटिकल मैल बाहेर व्हीटीएस यंत्रणा बसवून मासेमारी करता येणार आहे. आतापर्यंत २७९ पर्ससीननेटपैकी २३१ पर्ससीनधारकांनी व्हीटीएससाठी ना हरकत दाखला घेतला आहे. प्रत्यक्षात मात्र १०० जणांनी ही यंत्रणा बसविली आहे.’’  
- आनंद पालव,
परवाना अधिकारी, सहायक मत्स्य आयुक्त कार्यालय, रत्नागिरी

Web Title: Ratnagiri News ban on fishing through Persians