गुहागरात मोर्चावेळी कडकडीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

गुहागर - कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदनिमित्ताने आज दुपारी 11.30 च्या दरम्यान गुहागरमध्ये विविध बौद्ध समाजाच्या संघटनांनी मोर्चा काढला. तत्पूर्वी, सकाळी आबलोलीत वस्तीसाठी गेलेल्या एस.टी.च्या काचा अज्ञातांनी फोडल्या. त्यामुळे एसटी आगारात भीतीचे वातावरण होते.

गुहागर - कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदनिमित्ताने आज दुपारी 11.30 च्या दरम्यान गुहागरमध्ये विविध बौद्ध समाजाच्या संघटनांनी मोर्चा काढला. तत्पूर्वी, सकाळी आबलोलीत वस्तीसाठी गेलेल्या एस.टी.च्या काचा अज्ञातांनी फोडल्या. त्यामुळे एसटी आगारात भीतीचे वातावरण होते. दुपारी 3 वाजेपर्यंत तालुक्‍यात सर्वत्र बंद पाळण्यात आला.

सकाळी आबलोलीत एस.टी.चे नुकसान झाल्यानंतर पोलिस निरीक्षक आणि आगार व्यवस्थापकांची चर्चा झाली. 9 वाजल्यापासून एस.टी.ची सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे शाळा, कॉलेजसाठी आलेले अनेक विद्यार्थी शृंगारतळी, तळवली, पालशेत, आबलोली आणि गुहागर येथे अडकले. दुपारी मोर्चा संपल्यानंतर काही पालकांनी खासगी वाहनातून विद्यार्थ्यांना घरी नेले. 

तालुक्‍यातील बौद्ध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी व्यक्तिगत पातळीवर संपात सहभागी होण्याची विनंती आज सकाळी केली. सकाळी आबलोली येथून गुहागरकडे जाणाऱ्या एस.टी.च्या मागील काचा अज्ञात इसमांनी दगड मारून फोडल्या. गाडीच्या समोरील काचेवरही दगडफेक करण्यात आली. या घटनेने तालुक्‍यात अस्वस्थता पसरली होती.

तालुक्‍यातील मोठ्या बाजारपेठेतील व्यावसायिक संघटनांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातून गुहागर शहरात सकाळपासून मोर्चेकरी येण्यास सुरवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी सकाळी उघडलेली दुकाने 10.00 वाजताचे सुमारास बंद करण्यात आली. बौद्धजन सहकारी संघ, बौद्ध युवक मंच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन सेना या संघटनांच्या तालुक्‍यातील 78 शाखांमधील भीमसैनिक आणि महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा बाजारपेठ मार्गे तहसीलदार कार्यालयाजवळ आला. प्रमुख कार्यकर्त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसाठी तहसीलदारांकडे निवेदन दिले. 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भीमसैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हल्लेखोरांनी सामाजिक सलोखा आणि शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर हल्ल्याची सीबीआय चौकशी करून हल्लेखोरांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीने करीत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.

या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी सुरेश सावंत, संदीप सावंत, वैभव गमरे, प्रकाश कदम, विश्वनाथ कदम, पराग सावंत, संजय गमरे, सचिन कदम, रूपेश सावंत, समीर कदम, संदेश कदम सहभागी झाले होते. मोर्चेकरी परतीच्या मार्गाला लागल्यानंतर दुपारी 3 नंतर तालुक्‍यातील व्यवहार सुरळीत सुरू झाले. 

Web Title: Ratnagiri News Band in Guhagar