#MarathaKrantiMorcha  पावस पंचक्रोशीत कडकडीत बंद

सुधीर विश्‍वासराव
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पावस - सकल मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या जिल्हा बंदच्या हाकेला रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. पावसमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. 

पावस - सकल मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या जिल्हा बंदच्या हाकेला रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. पावसमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्चाने सर्वच जिल्ह्यात मुकमोर्चा काढल्यानंतर एकीचे बळ दाखवले. त्यानंतरही आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नसल्याने ठोक मार्चाला सुरवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात ताकद दाखविण्यासाठी आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

पावस विभागाने बैठका घेवून नियोजन केले. त्यानंतर पूर्णगड सागरी पोलिसांसमवेत चर्चा करून नियोजनबद्द बंदचे आवाहन केले. व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, शाळा, महाविद्यालयाने त्याला पाठिंबा देत आजचा बंद यशस्वी केला. त्यामुळे आज कोणत्याही दुकानदाराला दुकाने बंद करा, असे सांगण्याची वेळ आली नाही. नेहमी गजबजलेल्या पावस बाजारपेठ, बस स्थानक, रिक्षा स्टॅण्ड परिसरात शुकशुकाट होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त होता. त्याचबरोबर बँका, पोस्ट व दवाखाना परिसरात वर्दळ कमी होती. रत्नागिरी आगारातून सुटणार्‍या एसटीच्या पावस परिसरात ये-जा करणार्‍या 250 फेर्‍या रद्द करून मोर्चाला पाठिंबा दर्शवला. एसटी बंद झाल्याने ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाले होते. 

त्याचबरोबर काही किरकोळ प्रमाणात पर्यटकांची खासगी वाहने वगळता स्वामी स्वरूपानंद मंदिर परिसरातही नेहमीसारखी वर्दळ नव्हती. पावसचे फुलविक्रेते रणजित जमादार म्हणाले की, व्यापारी संघटना नेहमी सहकार्याची भावना ठेवते. त्यांच्या शब्दाला मान देवून आम्ही दुकान बंद ठेवले.

पावसमधून एकही बसफेरी नाही - टापरे

याबाबत पावस बसस्थानक प्रमुख श्री. टापरे म्हणाले की, एकंदरीत मोर्चाच्या माध्यमातून एसटीला लक्ष करून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे परिवहन खात्याचे नुकसान होऊ नये, यासाठी या स्थानकातून वस्तीच्या 15 फेर्‍या आगारात जमा करून एकही फेरी सोडण्यात आली नाही. 

 

Web Title: Ratnagiri News Band in Pawas Maratha reservation issue