कोकणात बीच शॅक हा सांस्कृतिक ‘शॉक’ ठरू शकतो!

राजेश कळंबटे
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

कोकणातील या समुद्र किनाऱ्यावर किती शॅक असतील हे अजून निश्‍चित नाही, पण त्यासाठी नागरिकांच्या सूचना महामंडळाने ५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या होत्या. ७२० किलोमीटरच्या या समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाला मोठा वाव असून, ‘बीच शॅक’ धोरणामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल, या उद्देशाने महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.

गोव्याच्या धर्तीवर कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘बीच शॅक पॉलिसी’ राबवण्याचा विचार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सुरू आहे. या धोरणाचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे, मात्र हे धोरण पर्यावरणाला हानिकारक ठरेल, अशी भीती व्यक्त करीत कोकणच्या किनाऱ्यांचा गोवा करण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. त्यामुळे धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना महामंडळाला पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरणप्रेमींचा विरोध बीच शॅक धोरणाला नाही. त्यातील अटी आणि शर्तींचा विचार गांभीर्याने केलेला नाही, असा त्यांचा आक्षेप आहे. शॅकमध्ये विशिष्ट किनाऱ्यांवर कासव संरक्षित करण्यासाठी सायंकाळी शॅक बंद ठेवावेत आणि शॅकमध्ये मद्यविक्रीला परवानगी देऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे.

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर ज्याप्रमाणे पर्यटकांना आराम करण्यासाठी किंवा बसण्यासाठी आरामखुर्ची आणि शॅक उपलब्ध करून दिलेले आहेत. तेथे खुलेआम मद्यप्राशनही करता येते. त्याचपद्धतीने कोकणातील संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर ‘शॅक’ उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घेतला आहे. यामुळे कोकण किनारपट्टीनजीक असलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर ‘बीच शॅक पॉलिसी २०१७’ चा मसुदा जाहीर करण्यात आला. यात किनाऱ्यावरील शॅकमध्ये मद्यविक्रीलाही परवानगी दिली आहे. समुद्र किनाऱ्यावरील छोट्याशा झोपड्यात आराम खुर्चीत निवांत बसून विविध पदार्थांचा आस्वाद पर्यटक घेतात. त्यासाठी पर्यटक गोव्याला जाणे पसंत करतात. याच धर्तीवर लवकरच महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर शॅकला परवानगी देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ‘बीच शॅक’ धोरणाचा मसुदा तयार केला आहे. त्यासाठी महामंडळाचा परवाना बंधनकारक असून, व्यावसायिकांना अनेक नियमांचे पालनही करावे लागेल. याठिकाणी परदेशी नागरिकांना शॅकचा परवाना देण्यात येणार नाही.

कोकणातील या समुद्र किनाऱ्यावर किती शॅक असतील हे अजून निश्‍चित नाही, पण त्यासाठी नागरिकांच्या सूचना महामंडळाने ५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या होत्या. ७२० किलोमीटरच्या या समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाला मोठा वाव असून, ‘बीच शॅक’ धोरणामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल, या उद्देशाने महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.

गोव्यासारखी हुल्लडबाजी, गुन्हेगारी नको
कोकणात पर्यावरण रक्षणासाठी आणि त्यातही प्रामुख्याने कासव संवर्धन यासाठी काम करणाऱ्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे भाऊ काटदरे यांनी या धोरणाला जोरदार विरोध केला आहे. सरकारच्या शॅक पॉलिसीमध्ये किनाऱ्यावरील शॅकमध्ये मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. तसेच कासवांची घरटी होतात, त्या किनाऱ्यावर फारच मोघम अटी ठेवल्या आहेत. या नवीन पॉलिसीमुळे कोकणच्या नितांत सुंदर व शांत किनाऱ्यावर गोव्यासारखी हुल्लडबाजी व गुन्हेगारी चालू होईल व कुटुंबवत्सल पर्यटक किनाऱ्यावर यायचा बंद होईल. कासवांची घरटी व्हायची बंद होतील, अशी भीती व्यक्त केली आहे. कासवांची संख्या आधीच घटत चालली आहे. शिकार आणि इतर बाबी त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत ‘बीच शॅक’ धोरण कासवांच्या घरट्यांसाठी आणि परिणामी कासवांसाठी धोकादायक वर्तवण्यात आली आहे.

सरकारच्या वेबपोर्टलवर विरोध
‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर अनेकांनी या धोरणाला विरोध केला आहे. पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होईल. तसेच शांत समुद्रकिनाऱ्यावरील निसर्ग, समुद्र जीवन, वनस्पती आणि समुद्रातील प्राणी जीवनावर त्याचा विपरित परिणाम होईल. पर्यटकांकडूून फेकला जाणारा कचरा समुद्रकिनाऱ्यावर साठून त्याचाही परिणाम होईल. हे धोरण लागू केल्यावर कोणकोणत्या दुःष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते, अशी अनेक कारणे यात पर्यावरणप्रेमींनी नोंदवली आहेत.

‘‘बीच शॅक पॉलिसीला आमचा विरोध मर्यादित आहे. त्यातील मद्य विक्रीला परवानगी देऊ नये व कासवांची घरटी होणाऱ्या बीचवर सायंकाळी ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत शॅक बंद ठेवावेत, अशा सूचना आम्ही केल्या आहेत.’’
- भाऊ काटदरे, सह्याद्री निसर्गमित्र

Web Title: Ratnagiri News 'Beach Shake Policy' shock to culture