भगवान महावीर जयंतीनिमित्त रत्नागिरीत शोभायात्रा

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 29 मार्च 2018

रत्नागिरी - भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे सुमारे चार तास शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये महावीरांचा पाळणा, पालखी होती. तसेच रथामध्ये महावीरांची सहा फुटांची मूर्ती स्थानापन्न केली होती. या वेळी ढोल-ताशांचा गजर आणि ढोलकी-झांजेच्या तालावर पारंपरिक गीते म्हणण्यात आली. रुग्णवाहिकेद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला.

राम मंदिरासमोरील जैन मंदिरातून सकाळी यात्रेला प्रारंभ झाला. यानंतर राम आळी, धनजी नाका, मारुती आळीमार्गे पुन्हा जैन मंदिरापर्यंत यात्रा काढण्यात आली. यात्रेमध्ये शहर परिसरातील जैन बांधव व माता भगिनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेच्या अग्रस्थानी जैन समाजातील लहान मुलगा घोड्यावर बसला होता. अन्य एका रथामध्ये गेल्या महिन्यात दीक्षा घेतलेल्या जैन बांधवांचे कटआऊट्स लावले होते.

या शोभायात्रेत रुग्णवाहिकेद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला. रस्त्यावरून वाहन चालवताना रुग्णवाहिका आल्यास तिला प्रथम पुढे जाण्यासाठी वाट द्या, त्यामधील रुग्णांसाठी दोन मिनीटे प्रार्थना करा, कदाचित तुमच्या प्रार्थनेमुळे रुग्णाचा जीव वाचू शकेल. जैन कर्मवाद सिद्धांतानुसार दुसर्‍यांसाठी केलेली प्रार्थना ही तुमच्यासाठी वरदान आहे, ती कधीच निष्फळ जात नाही. त्यामुळे तुमच्यावर येणारी संकटेसुद्धा टलतात, असा फलक रुग्णवाहिकेवर लावण्यात आला होता.

महावीर जयंतीनिमित्त जैन बांधवांची कपडे, ज्वेलर्स व अन्य विविध प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जैन मंदिराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले. जैन श्‍वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष भरत जैन व सर्व पदाधिकार्‍यांनी शोभायात्रा यशस्वी केली.

Web Title: Ratnagiri News Bhagavan Mahaveer Shobhayatra