युतीसारखे निष्क्रिय सरकार पाहिले नाही - भास्कर जाधव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक सरकारे पाहिली. पण युतीच्या या सरकारपेक्षा निष्क्रिय, नियोजनशून्य कारभार असलेले सरकार पाहिले नाही. त्यामुळेच विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. 

रत्नागिरी -  माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक सरकारे पाहिली. पण युतीच्या या सरकारपेक्षा निष्क्रिय, नियोजनशून्य कारभार असलेले सरकार पाहिले नाही. त्यामुळेच विकासाचा बट्ट्याबोळ झाला आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी केली. 

सेना-भाजपच्या भांडणामुळे कोकणाचे वाटोळे झाले आहे. आघाडी शासनाच्या काळात आम्ही सत्तेचे विकेंद्रीकरण केले. युतीच्या काळात केंद्रीकरण करून सरंजामशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लोकशाही धोक्‍यात आली आहे, असेही आमदार जाधव म्हणाले. 

रत्नागिरी दौऱ्यावर आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. जाधव म्हणाले की, भाजप-शिवसेना युती सरकारने देशावर 5 लाख कोटीचा बोजा टाकला आहे. आमच्या काळात भारनियमन बंद झाले होते, ते पुन्हा सुरू झाले. कर्जमाफीतून शेतकऱ्यांची चेष्टा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढल्या. निवडणुकांपूर्वी दिलेले धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन हवेतच विरले. मराठा समाजाला 16 टक्के दिलेले आरक्षण आणि मुस्लिम समाजालाही 5 टक्के आरक्षण टिकवू शकले नाहीत. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेली नोटाबंदी फसली. घराघरात महिलांनी साठविलेला पैसा बाहेर काढला. त्यात जीएसटी कर प्रणाली सुरू केली. त्याने तर सर्व व्यवसाय बसवून ठेवले.

शासनाला तीन महिन्यात फेर विचार करायला लागला हे युतीचे मोठे अपयश. डिझेल, पेट्रोल दर भरमसाठ वाढवले. शासकीय योजना 100 टक्के बंद आहेत. एक नवीन योजना किंवा ठोस सांगण्यासारखे विकासकामे यांच्याकडे नाही. पंतप्रधन सडक योजना बंद, शाळा दुरूस्ती नाही, निर्मल ग्रामचे नाव बदलून स्वच्छ भारत योजन सुरू केली. परंतु केंद्राचा एक पैसा निधी नाही. कोपर्डी प्रकरणातील आरोपींनी शिक्षा नाही, एवढे अपयशी सरकार विकासाला मारक आहे., असेही श्री जाधव म्हणाले.

सेनेवर टीका करताना श्री जाधव म्हणाले की शिवसेना सत्तेत असूनही गोंधळलेल्या अवस्थेत आहे. काय बोलावे हेच त्यांना कळत नाही. सकाळी केलेले वक्तव्य संध्याकाळी बदलतात. सेनेला घटनेच्या चौकटीत राहून विकासकामे करून घेण्याचे काडीचेही ज्ञान नाही. तीन वर्षे झाली त्यांना पाच वर्षे संधी द्यायलाच हवी. तेव्हा सरकार चालवण्याची कुवत स्पष्ट होईल. शिवसेनेने जिल्ह्यात तीन मंत्रिपदे दिली. माझे आव्हान आहे की, त्यांनी एकतरी भरीव काम केल्याचे दाखवावे. 

पालकमंत्र्यांना मदत न करण्याचा रोग बळावला 
जिल्ह्याचे पालकमंत्री सज्जन आहेत. ते मुंबईत राहिलेले, त्यामुळे ग्रामीण विकाससूत्र त्यांच्या लक्षात आलेले नाही. पालकमंत्र्यांना मदत न करण्याचा रत्नागिरीला जुना रोग आहे. आता तो बळावला, असा टोलाही जाधव यांनी लगावला. 

Web Title: ratnagiri news Bhaskarao Jadhav Press