गर्दी मतात रूपांतर करण्याचे भाजप बूथ संमेलनात आव्हान

मुझफ्फर खान
बुधवार, 17 जानेवारी 2018

चिपळूण - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळुणात भाजप कार्यकर्त्यांचे संमेलन झाले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पक्षाची वातावरण निर्मिती झाली. आता या गर्दीचे मतदारांमध्ये व मतदानामध्ये रूपांतर करण्याचे आव्हान पक्षासमोर आहे.

चिपळूण - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळुणात भाजप कार्यकर्त्यांचे संमेलन झाले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पक्षाची वातावरण निर्मिती झाली. आता या गर्दीचे मतदारांमध्ये व मतदानामध्ये रूपांतर करण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू चेतना संगम कार्यक्रमानंतर भाजप कार्यकर्त्यांचे झालेले संमेलन म्हणजे भाजपने २०१९ च्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

निवडणुकीदरम्यान भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चांगली मदत होते. याआधी दीर्घ काळात कोकण प्रांतामध्ये संघाचा हिंदू चेतना संगमाचा कार्यक्रम कधी झाला नव्हता. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळुणात पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यांचे संमेलन झाले. मानेंचा वाढदिवस १० जानेवारीला असतो. परंतु वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचे संमेलन घ्यायचे त्यानिमित्ताने पक्षाचे शक्तिप्रदर्शन करायचे आणि तेही चिपळूणमध्येच करायचे हे सर्व पूर्वनियोजित ठरलेले होते. याचे कारण मागील तीन वर्षांपासून भाजपने पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे.

बाळ माने यांना चिपळूण विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली तर या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. 
- विजय चितळे,
 
शहर चिटणीस, भाजप चिपळूण

दोन वर्षापूर्वी बाळ माने यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आल्यानंतर त्यांनी गावोगावी संघटना बांधणी सुरू केली. एक बूथ, २५ यूथ अशी टॅगलाईन घेऊन भाजपचे जिल्ह्यात काम सुरू झाले.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नाही. मात्र प्रथमच स्वतंत्र निवडणुका लढविणाऱ्या भाजपला उमेदवार मिळाले हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. ग्रामीण भागात आपले मतदार कुठे आणि किती आहेत. ते वाढविण्यासाठी काय करावे लागेल हे निवडणुकीतून उमगले. त्यानंतरच भाजपने चिपळूणकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. चिपळूण पालिका निवडणुकीपूर्वी मानेंनी चिपळूण शहराला दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. तेथे भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. भाजपचा एकही नगरसेवक नसलेल्या चिपळूण पालिकेत पक्षाचे चार नगरसेवक आहेत. ८० टक्के बूथ कमिट्याही तयार झाल्या आहेत. म्हणजेच चिपळुणात भाजप वाढण्यासाठी वाव आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे संमेलन चिपळुणात घेतले. गावोगावी त्याचा प्रचार झाला. त्यासाठी वातावरण निर्मिती झाली.

‘चिपळुणात सुरेंद्र’
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने रत्नागिरीनंतर चिपळूण विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावण्याची शक्‍यता आहे. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्र देवेंद्र आणि चिपळुणात सुरेंद्र असे घोषवाक्‍य भाजपमध्ये सुरू झाले आहे. रत्नागिरीसारख्या ठिकाणी त्याला चेष्टेची किनार आहे.

Web Title: Ratnagiri News BJP booth gathering in Chiplun