महामंडळवर नियुक्तीसाठी रत्नागिरीकरांचे मुंबईत ठाण

मुझफ्फर खान
मंगळवार, 24 एप्रिल 2018

चिपळूण - राज्य मंत्रिमंडळाचा कारभार चालविताना शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला उपेक्षित ठेवले. राज्य शासनाकडून विविध दहा महामंडळांवरील नियुक्त्या या आठवड्यात होण्याचे संकेत आहेत. जिल्ह्याच्या वाट्याला एकतरी महामंडळाचे अध्यक्षपद यावे, यासाठी अनेकजण मुंबईत ठाण मांडून बसले आहेत.

चिपळूण - राज्य मंत्रिमंडळाचा कारभार चालविताना शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला उपेक्षित ठेवले. राज्य शासनाकडून विविध दहा महामंडळांवरील नियुक्त्या या आठवड्यात होण्याचे संकेत आहेत. जिल्ह्याच्या वाट्याला एकतरी महामंडळाचे अध्यक्षपद यावे, यासाठी अनेकजण मुंबईत ठाण मांडून बसले आहेत.

महामंडळावरील नियुक्त्यांच्या पार्श्‍वभूमीवर सेना, भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या नेत्यांना गळ घालण्यास सुरवात केली आहे. त्यातच महामंडळाचे अध्यक्ष व संचालक यांना कामासाठी जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

एखाद्या महामंडळावर स्थान मिळेल या आशेने जिल्ह्यातील काहीजण मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. ज्यांना मंत्रिपद किंवा महामंडळावर नियुक्ती देणे पक्षाला अडचणीचे वाटते अशांची संघटनातील महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावली जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्या करण्यासाठी भाजप, शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. महामंडळावरील नियुक्त्या होण्याचे संकेत प्राप्त झाल्यानंतर पक्षाअंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील पदाधिकार्‍यांनी महामंडळावर आपल्याला संधी मिळावी, या आशेने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी तसेच मंत्र्यांशी संपर्क करून गळ घालण्यास सुरवात केली आहे.

राज्यातील प्रमुख पक्ष म्हणून सर्वाधिक महामंडळे भाजपकडे राहतील. दुसर्‍या क्रमांकावर शिवसेनेला महामंडळे मिळतील. राज्यात भाजपची सत्ता आली. मात्र जिल्ह्याला भाजपच्या कोट्यातून काहीच मिळाले नाही. तरीही बाळ माने यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा हातात घेतली. सत्तेचा उपयोग करून त्यांनी जिल्ह्यात पक्षाची बांधणी केली. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले नाही मात्र मतांची संख्या वाढली. भाजपचे कमळ दारोदारी पोहचले.

नगरपंचायत आणि पालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. कोकणात शिवसेनेचे बर्‍यापैकी वर्चस्व आहे. बहुतांशी गावचे सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. सर्वाधिक आमदार, दोन्ही जिल्ह्याचा खासदार आणि पालकमंत्री शिवसेनेचाच आहे. राज्य मंत्रिमंडळातील एकूण मंत्रिपदांपैकी शिवसेनेच्या वाट्यात मंत्रिपदे कमी आली तरीही भौगोलिक रचनेचा विचार करताना शिवसेनेकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकच मंत्रिपद देण्यात आले. शिवसेना सोडून गेलेले नारायण राणे यांना राजकीयदृष्ट्या शह देण्यासाठी सेनेकडून दीपक केसरकर यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी रत्नागिरी जिल्ह्याला उपेक्षितच ठेवले.

सध्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. ही निवडणूक झाल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची रणधुमाळी सुरू होईल. त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील. म्हणजे महामंडळाचे अध्यक्ष व संचालक यांना कामासाठी जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी हे पद न घेतलेलेच बरे. जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असणे हे महामंडळ आणि मंत्रिपदापेक्षा मोठे आहे. 

- नित्यानंद जोशी, चिपळूण

Web Title: Ratnagiri News Board of Directors selection issue