सुरवंटाचे फुलपाखरू बनताना अनुभवले

सुरवंटाचे फुलपाखरू बनताना अनुभवले

राजापूर - पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष घेतलेले ज्ञान आणि त्यातून मिळालेला अनुभव किती उपयुक्त ठरतो याचा अनुभव शहरानजीकच्या शीळ येथील जिल्हा परिषद शाळा नं. २ मधील विद्यार्थ्यांना आला. झाडांच्या पानावरील अळ्यांचा स्वतः शोध घेऊन त्यांची मुलांनी निगा राखली. प्लास्टिकच्या बरणीतील सुरवंटाचे रंगबीरंगी पंखांच्या फुलपाखरात रूपांतर होईपर्यंतचा एकोणीस दिवसांचा प्रवास मुलांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. 

विद्यार्थ्यांनी पूर्ण वाढ झालेल्या ‘क्रिमसन रोज’ प्रजातीच्या फुलपाखराने हवेत झेप घेताच टाळ्यांच्या गजरात त्याला मुक्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. अशा दहा फुलपाखरांना जोपासून मुलांनी सोडले. प्रत्यक्षात फुलपाखरांचा जीवनप्रवास अनुभवण्याची संधी फारच कमीजणांना मिळते. मात्र, शीळ येथील विद्यार्थी याबाबत नशीबवान. मुख्याध्यापक सुनील किनरे आणि शिक्षक गजानन डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी फुलपाखराचा जीवनप्रवास जवळून अनुभवला.

यावर्षी परिसरातील झाडांवर सापडलेल्या फुलपाखराच्या अळ्या या मुलांनी बरण्यांमध्ये ठेवून त्यांचे संगोपन केले. संगोपनदरम्यान अळीच्या जीवनातील दररोजचे बदल पाहून विद्यार्थ्यांनी नोंदीही केल्या. कोषातून बाहेर पडल्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराने पंख फैलावून जीवनातील पहिली हवेत घेतलेली झेप प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांनी पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे, केंद्रप्रमुख सुयोगा जठार यांनाही अनुभवण्यास दिली. फुलपाखराच्या या जीवनप्रवासाचा अनुभव आनंददायी होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांसमवेत अनुभवलेली फुलपाखराची हवेतील पहिली झेप रोमांचकारी होती. पुस्तकात अभ्यासलेला फुलपाखराचा जीवनप्रवास प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, त्यांना शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन कौतुकास्पदच आहे.
- मुरलीधर वाघाटे, 
सहायक गटविकास अधिकारी

विद्यार्थ्यांचे अनुभव कथन
प्रत्यक्ष अनुभवातून फुलपाखराच्या जीवनप्रवासाविषयी विद्यार्थ्यांना माहिती झाली. अळ्या कशा असतात, कोष कसा आणि कुठे असतो, कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखराला नेमक्‍या कुठल्या झाडाची पाने खाण्यासाठी लागतात, कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखराला ही पाने किती दिवसानंतर द्यावी, असे सारे अनुभव विद्यार्थ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com