विधानसभेसाठी शिवसेना संगमेश्‍वरला प्राधान्य देण्याची शक्यता 

संदेश सप्रे
सोमवार, 4 जून 2018

संगमेश्‍वर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातून शिवेसेनेकडून संगमेश्‍वरला प्रतिनिधित्व मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या मतदारसंघातून उमेदवार म्हणून जि. प. सदस्य रोहन सुभाष बने यांचे नाव पुढे येण्याची चर्चाही तालुक्यात सुरू आहे.

संगमेश्‍वर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातून शिवेसेनेकडून संगमेश्‍वरला प्रतिनिधित्व मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या मतदारसंघातून उमेदवार म्हणून जि. प. सदस्य रोहन सुभाष बने यांचे नाव पुढे येण्याची चर्चाही तालुक्यात सुरू आहे.

2009 ला राज्यात विधानसभा मतदारसंघांची फेररचना झाली. यात संगमेश्‍वर तालुक्याचे तीन भाग झाले. साखरपा परिसर राजापूरला तर नावडी (संगमेश्‍वर) परिसर रत्नागिरी मतदारसंघात विलीन झाला. संगमेश्‍वर तालुक्याचा सर्वाधिक भाग चिपळूण मतदारसंघात विलीन झाला. फेररचनेनंतर शिवसेनेकडून पहिल्यांदाच येथून चिपळूणचे तत्कालीन तालुकाप्रमुख सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी संगमेश्‍वरमधून जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, उद्योगपती श्रीधर जाधव इच्छुक होते. त्यावेळी पुढची टर्म संगमेश्‍वरला असा अलिखित करार होऊन  उमेदवारी निश्‍चित झाली. 2014 ला राज्यात सर्वच पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले यामुळे ऐनवेळी धोका नको यासाठी विद्यमान आमदारांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली. या कारणाने सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळून ते विजयी झाले. गेल्या 10 वर्षात या मतदारसंघात शिवसेना फोफावली. आगामी निवडणुकीनंतर मतदारसंघांची पुन्हा फेररचना होणार आहे त्यामुळे 2019 ला चिपळूण - संगमेश्‍वर मतदारसंघातून संगमेश्‍वरचाच उमेदवार मिळावा यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 

राष्ट्रवादीचा उमेदवार चिपळूण तालुक्यातीलच असणार. भाजपचे अजुनही तळ्यात मळ्यात आहे. युती झाल्यास हा मतदार संघ शिवसेनेकडेच राहणार. त्यामुळे यावेळी तरी संगमेश्‍वरला प्रतिनिधीत्व मिळावे, असे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात विविध कार्यक्रमांना बनेंची उपस्थिती हे त्यांच्या लाँचिंगचेच प्रयत्न आहेत.

बनेंची एंट्री की चव्हाणांची हॅट्रीक ?

चर्चेनुसार विद्यमान आमदार चव्हाण येथून हॅट्रीक साधण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता बनेंची एंट्री की चव्हाणांची हॅट्रीक असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याचे उत्तरही लवकरच सापडणार आहे.

Web Title: Ratnagiri News Chiplun - Sangmeshwar Politics special