सिव्हिल इंजिनिअरचा हत्याराने वार करून खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

* अंगावर आठ वार 
* मोबाईलमुळे लागणार तपास 
* जि. प., पं.स. समितीची कामे 
* खुनाचे कारण अस्पष्ट 

रत्नागिरी - तालुक्‍यातील सोमेश्‍वर-बौद्धवाडीजवळील दादरचा पऱ्यात सिव्हिल इंजिनिअरचा भरदिवसा धारदार हत्याराने आठ वर्मी वार करून खून केल्याचा प्रकार आज उघड झाला. या घटनेने सोमेश्‍वर गाव हादरून गेला आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना पऱ्याच्या पाण्यामध्ये मृतदेह दिसल्यानंतर हा प्रकार उघड झाला. कट रचूनच निर्घृणपणे खून केल्याचा प्राथमिक अंदाज असून, खुनाचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सुहास लक्ष्मण घाटिवळेकर (वय 40, रा. बौद्धवाडी-सोमेश्‍वर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बौद्धवाडीपासून बाजूला सड्यावर हा दादरचा पऱ्या आहे. सुहासला सकाळी नऊ वाजता सोमेश्‍वर येथे अनेकांनी पाहिले होते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आईला त्रास नको, म्हणून सुहास दर रविवारी दादरच्या पऱ्यामध्ये स्वतःचे कपडे धुण्यासाठी जातो. नेहमीच्या सवयीप्रमाणे तो आजही सॅक, कपड्यांचे बोचके, बूट आदी घेऊन दुचाकीने कपडे धुण्यासाठी पऱ्यावर गेला होता. गुराखी किंवा कपडे धुण्यासाठी येणाऱ्यांची या पऱ्याकडे ये-जा असते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काही महिला कपडे धुण्यासाठी पऱ्यावर गेल्या. तेव्हा सुहासचा मृतदेह पऱ्याच्या पाण्यात अर्धवट अवस्थेत बुडालेला दिसला. त्यानंतर गावामध्ये वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. 

सुहासच्या भावाने याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. पोलिस हवालदार श्री. जाधव यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. वराळे, श्री. पंडये आदी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह जवळून पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर वार दिसत होते. पऱ्यामध्ये मद्याच्या बाटल्या, काही खाद्यपदार्थांच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामुळे मद्यप्राशन करणाऱ्यांबरोबर झालेल्या वादातून हा खून झाला की, आर्थिक किंवा नाजूक विषयातून कट रचून हा खून करण्यात आल्याचा तर्क बांधला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेची टीम आणि शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी घटनास्थळी आले. त्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृताच्या चेहऱ्यावर चार, मानेखाली डाव्या बाजूला दोन, कानांवर आणि डोक्‍यात असे आठ वर्मी घाव होते. गंभीर किंवा नाजूक विषयातून अतिशय क्रूरपणे धारदार हत्याराने हे वार केल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दरम्यान त्या भागातून येता-जाता कोणाला पाहिले का याची माहिती घेतली जात आहे. तसेच सुहासचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे या घटनेदरम्यान त्याला कोणी-कोणी फोन केले, याची माहिती मिळविण्याचे काम सुरू झाले आहे. 

सुहास सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची अनेक कामे तो करीत होता. लांजा, रत्नागिरी तालुक्‍यात त्याची कामे सुरू होती. दोन भाऊ, एक बहीण असा त्यांचा परिवार आहे. मोठा भाऊ शिक्षक आहे. 

हट्ट करणाऱ्या पुतण्याला दिला होता नकार 
सुहास घाटिवळेकर हा दादरच्या पऱ्यावर जात असताना छोटा पुतण्या त्याच्या मागे लागला होता; परंतु सुहासने त्याला नकार देत तू येऊ नको, असे सांगितले. त्यामुळे मारेकऱ्यांना आयती संधी मिळाली. भरदुपारी पऱ्यावर कोणी नसल्याचे पाहून सुहासचा काटा काढल्याचे बोलले जाते. त्याची दुचाकी तिथेच पुलावर होती. सुहास आणि त्याच्या कुटुंबाबाबत सर्वचजण आदराने बोलत होती. त्यामुळे त्याचा खून एवढ्या क्रूरतेने का करण्यात आला, याचा तपास पोलिस करीत आहेत. 

Web Title: ratnagiri news Civil Engineer murder konkan