गुरुजी कंगाल; पतपेढी मालामाल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

संगमेश्‍वर तालुक्‍यातील अनेक गुरुजींना कमॉडिटी मार्केटच्या नावाखाली लाखोंचा चुना लावणाऱ्या त्या ब्रोकरबाबत चर्चा रंगत आहे. त्याचबरोबर त्याचे वेगळे आयाम पुढे येत आहेत. या प्रकरणात गुरुजी कंगाल, त्यांची पतपेढी मात्र मालामाल, अशी चर्चा सुरू आहे. जादा व्याजाच्या हव्यासाने अनेक गुरुजींनी पगाराच्या जोरावर पतपेढीतून कर्जे उचलली; पण आता मार्केट बुडाले आणि कर्ज भागविण्याची वेळ आल्याने गुरुजींनाच कंगाल होण्याची वेळ आली आहे.

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यातील अनेक गुरुजींना कमॉडिटी मार्केटच्या नावाखाली लाखोंचा चुना लावणाऱ्या त्या ब्रोकरबाबत चर्चा रंगत आहे. त्याचबरोबर त्याचे वेगळे आयाम पुढे येत आहेत. या प्रकरणात गुरुजी कंगाल, त्यांची पतपेढी मात्र मालामाल, अशी चर्चा सुरू आहे. जादा व्याजाच्या हव्यासाने अनेक गुरुजींनी पगाराच्या जोरावर पतपेढीतून कर्जे उचलली; पण आता मार्केट बुडाले आणि कर्ज भागविण्याची वेळ आल्याने गुरुजींनाच कंगाल होण्याची वेळ आली आहे.

संगमेश्‍वरातील त्या ‘राजे’शाही ब्रोकरचे किस्से संपता संपत नसल्याने गुरुजी हैराण झाले आहेत. त्यात या प्रकरणात गुरुजींना आपल्या वाणीने मोहित करून भागीदारी करणाऱ्या एका केंद्रप्रमुखाचे नावही महत्त्वाचा भागीदार म्हणून पुढे आल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. त्या ब्रोकरच्या घोटाळ्याला वाचा फुटल्यानंतर हा केंद्रप्रमुख सुतकी चेहऱ्याने वावरत आहे.

दुसरीकडे या ब्रोकरच्या नादात गुरुजींची पतपेढी मात्र मालामाल झाल्याचे चित्र आहे. लाखाला पाच हजारांचे मासिक व्याज म्हणजेच पाच लाख गुंतवले की २५ हजार मिळणार. पतपेढीतून कर्ज काढले की त्याचा हप्ता जेमतेम १० हजार उर्वरित १५ हजार खिशात राहणार म्हणजेच पगाराच्या निम्मी रक्‍कम आयतीच मिळणार आणि पगार तसाच शिल्लक राहणार शिवाय कर्जही भागणार आणि मासिक खर्चही भागणार, असे मजले बांधून अनेक गुरुजींनी पतपेढीचे कर्ज काढले. केंद्रप्रमुखाद्वारे ब्रोकरकडे गुंतवलेही. 

दोन चार महिने व्याज मिळाले. त्यानंतर पुढचे व्याज बंद झाले आणि पतपेढीचा हप्ता पगारातूनच भरण्याची वेळ आल्यावर एकेकाचे डोळे पांढरे झाले. हे कोण कोण अशी चर्चा सुरू आहे. ज्यांच्या अर्धांगिनीही ज्ञानदानाचे काम करतात त्यांचे ठीक आहे, मात्र जे गुरुजी एकुलते एक कमावते आहेत ते मात्र कपाळाला हात लावून बसले आहेत. 

विक्रमी कर्ज उचल
कर्ज काढले म्हणजे हप्ता भरणा आलाच, अचानक या ब्रोकरच्या नादात पतपेढीतून विक्रमी कर्ज उचल झाली आणि पतपेढीचा नफाही अचानक काही लाखांच्या घरात गेला आहे. यामुळे गुरुजींच्या पतपेढीला चांगले दिवस आले. कोणाचे काय आणि कोणाचे काय, अशी मल्लीनाथी यावर सुरू आहे.

Web Title: ratnagiri news commodity marketing Fraud