46 धरणांतून विसर्ग सुरू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

भरून वाहणारी धरणे 
पणदेरी, चिंचाळी, तुळशी (मंडणगड), सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, टांगर, पंचनदी (दापोली), शेलडी, कोंडिवली, पिंपळवाडी, शेलारवाडी, तळवट (खेड), गुहागर, तिवरे, फणसवाडी, मालघर, कळवंडे, अडरे, खोपडे, मोरवणे, आंबतखोल, असुर्डे, राजेवाडी (चिपळूण), साखरपा, मोर्डे, तेलेवाडी, कडवई, निवे, गडनदी, रांगव, गडगडी (संगमेश्‍वर), शिपोशी, व्हेळ, गवाणे, झापडे, बेणी, मुचकुंदी, हर्दखळे, इंदवटी (लांजा), कशेळी, अर्जुना, बारेवाडी, ओझर, गोपाळवाडी, वाटूळ (राजापूर) ही धरणे भरून वाहू लागली आहेत. 

रत्नागिरी - जिल्ह्यातील 63 लघू व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांपैकी 46 प्रकल्पांच्या सांडव्यांवरून विसर्ग सुरू झाला आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती असून या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. 

जून, जुलै महिन्यात पावसाचा जोर यावर्षी कमी होता. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी पावसाची नोंद 2497 मिमी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 3266 मिमी सरासरी पाऊस झाला होता. सुमारे आठशे मिमी कमी पाऊस झाला आहे. श्रावण महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. श्री गणरायाच्या आगमनाच्या दिवशी मुसळधार पावसाला सुरवात झाली. शुक्रवारीही (ता. 26) संततधार सुरुच होती. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री यासारख्या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांवर उभारलेली धरणेही तुडूंब भरली आहेत. काही धरणांच्या सांडव्यांवरून पाणी वाहू लागले आहे. 

जिल्ह्यात नातूवाडी, गडनदी, अर्जुना हे मध्यम, तर उर्वरित 60 लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. पावसामुळे त्यातील पाणी साठा वाढला आहे. सर्व प्रकल्पात मिळून एकूण साठा 444 दशलक्षघनमीटर आहे. सध्या 373.43 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. 84 टक्‍के पाणी साठा असल्याने भविष्यात त्याचा फायदा दुबार शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. या धरणातील पाण्याचा वापर कमी प्रमाणात होतो. यातील काही धरणांवरून नळपाणी योजना राबविल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिला तर पाणीसाठा स्थिर राहण्यास मदत होईल. 

Web Title: ratnagiri news dam