सांगवेतील धोकादायक पूलाच्या पिलरचा काही भाग ढासळला

संदेश सप्रे
सोमवार, 30 जुलै 2018

देवरूख - कोसुंब - तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवर असलेला धोकादायक पूलाच्या पिलरचा काही भाग आज अखेर ढासळलाच. यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली असून तीन गावांचा संपर्क तुटला आहे.

देवरूख - कोसुंब - तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवर असलेला धोकादायक पूलाच्या पिलरचा काही भाग आज अखेर ढासळलाच. यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली असून तीन गावांचा संपर्क तुटला आहे.

‘सकाळ’ने गेल्याच महिन्यात या पुलाबाबत वृत्त प्रसिद्ध करून बांधकाम विभागाला इशारा दिला होता. याकडे दुर्लक्ष झाल्याने आज हा प्रकार घडला. लोकल बोर्डाच्या काळात 1962 ला सांगवेतील प्रतिष्ठित ग्रामस्थ मेजर सीताराम लक्ष्मण शेलार यांच्या पाठपुराव्याने सप्तलिंगी नदीवर पूल मंजूर झाला होता.

देवरुखातील प्रथितयश ठेकेदार बाबुराव आंबेकर यांनी 56 वर्षापूर्वी या पुलाची चुना, गूळ आणि काळ्या दगडात उभारणी केली होती. पूल झाल्यापासून आजपर्यंत याची डागडुजी झाली नाही. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात पुलाच्या डाव्या बाजूचा भराव वाहून गेला. यानंतर काही दिवस वाहतूक बंद होती. बांधकामने तात्पुरते उपाय केल्यावर वाहतूक सुरू झाली. पालकमंत्री वायकर यांनी पुलाच्या डागडुजीसाठी 10 लाख मंजूर केले यातून ढासळलेला भराव पुनर्भरणाचे काम गेले काही महिने सुरू आहे. अशा स्थितीत पुलाचा सुरवातीचा पिलर आज सकाळी पायाकडून ढासळला. तेथे काम करत असलेल्या कर्मचार्‍यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यावर त्यांनी तत्काळ पुलावरील वाहतूक बंद केली.

सरपंच देवदत्त शेलार यांना माहिती कळताच त्यांनी पुलाची पाहणी करून याची माहिती महसूल विभाग आणि एसटी प्रशासनाला दिली. या मार्गावरच्या बसफेर्‍या पुलाअलीकडपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या आहेत, तर इतर वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. ताम्हाने पंचक्रोशी आणि  सांगवे, फणसट आणि तुळसणी गावचा संपर्क यामुळे तुटला आहे. 

सुदैवाने अनर्थ टळला

आज सकाळी हा प्रकार घडला त्याचवेळी फणसटकडून प्रवाशांनी खचाखच भरलेली बस पुलावरून गेली. त्याचवेळी पुलाने जोरात हादरा दिला. कामगारांनी गाडी नेऊ नका अशी विनंती करूनही चालकाने पुलावरून गाडी घातली. सुदैवाने अनर्थ टळला. त्यानंतर येथून एकही वाहन जाऊ देण्यात आलेले नाही. 

Web Title: Ratnagiri News Dangerous bridge pillar collapse in Sangve