कोकण विद्यापीठाची मागणी विधिमंडळात मांडावी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

चिपळूण - कोकणशी नाते असलेल्या ५६ आमदारांना एकत्र करून विधिमंडळात स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी करावी. कोकणची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची निर्मिती झाली तर विद्यार्थ्यांचा शहराकडे जाणारा ओढा थांबेल. ही चळवळ केवळ संस्थांपुरती सीमित न राहता विद्यार्थ्यांची बनली पाहिजे, असे विचारमंथन कोकण विद्यापीठ निर्धार सभेत झाले.

चिपळूण - कोकणशी नाते असलेल्या ५६ आमदारांना एकत्र करून विधिमंडळात स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी करावी. कोकणची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची निर्मिती झाली तर विद्यार्थ्यांचा शहराकडे जाणारा ओढा थांबेल. ही चळवळ केवळ संस्थांपुरती सीमित न राहता विद्यार्थ्यांची बनली पाहिजे, असे विचारमंथन कोकण विद्यापीठ निर्धार सभेत झाले. येथील डीबीजे महाविद्यालयात कोकण विद्यापीठ कृती समितीने सभेचे आयोजन केले होते. 

कृती समितीचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे म्हणाले, ‘‘कोकण बोर्ड झाल्यावर येथील गुणवत्ता समोर आली. मुंबई विद्यापीठाशी ६६४ महाविद्यालये आणि १८ लाख विद्यार्थी जोडलेले आहेत. या संख्येला विद्यापीठ न्याय देऊ शकत नाही. 

मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र अपयशी ठरत आहे. राज्यात अन्य ठिकाणी ४० महाविद्यालये संलग्न असलेली विद्यापीठे आहेत. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मिळून कोकणात १०३ महाविद्यालये आहेत. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठाची आवश्‍यकता आहे. ही चळवळ विद्यार्थ्यांनी हाती घ्यावी.’’ 

आमदार राजन साळवी म्हणाले, ‘‘कोकण विद्यापीठासाठी अशासकीय ठराव विधिमंडळात ७ एप्रिल २०१७ ला मांडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठकीचे आश्‍वासनही दिले होते. १० वर्षांपासून सुरू असलेल्या या चळवळीला निश्‍चित यश येईल.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील १२ आमदार, येथील संस्थाचालक आणि कृती समिती यांच्यासोबत शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांची बैठक घेण्याबाबत प्रयत्न करेन.’’ आमदार सदानंद चव्हाण यांनीही लक्षवेधीतून अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोकण विद्यापीठाचा प्रश्‍न आम्ही मांडू. त्यासाठी कोकणातील आमदारांना सोबत घेऊ. शिक्षणमंत्री कोकणातील असल्याने विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, असे सांगितले.

या वेळी उपस्थित सर्वांनी स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या ठरावाला हात उंचावून संमती दिली. या सभेला सदानंद भागवत, अभिजित हेगशेट्ये, आबा सावंत, अशोक चव्हाण, जावेद ठाकूर, सुधीर दाभोळकर, विनोद दळवी, मंगेश तांबे, सुजय रेडीज हे संस्थाचालक, चिपळूणमधील शिक्षणप्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News demand of Konkan University