देवरुखात राजकीय धुळवडीला सुरवात

संदेश सप्रे 
मंगळवार, 6 मार्च 2018

देवरूख - ऐन शिमगोत्सवातच देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जारी झालेल्या आचारसंहितेने देवरूखच्या रणांगणात राजकीय धुळवडीला प्रारंभ झाला आहे. यावेळची निवडणूक ही शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

देवरूख - ऐन शिमगोत्सवातच देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जारी झालेल्या आचारसंहितेने देवरूखच्या रणांगणात राजकीय धुळवडीला प्रारंभ झाला आहे. यावेळची निवडणूक ही शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने देवरूखचा नवा कारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला अवघा महिना शिल्लक आहे. याच दरम्यान उमेदवार जाहीर करून अर्ज भरणे, छाननी, माघार असे दिवस सोडल्यास प्रचारासाठी काही मोजकेच दिवस सर्वांना मिळणार आहेत. यावेळची नगराध्यक्ष निवडणूक थेट होणार असल्याने सभागृहातील संख्याबळाबरोबरच थेट नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांना जोर लावावा लागणार आहे.

सध्याचे पक्षीय बलाबल -

  • शिवसेना......................7

  • भाजप.........................6 

  • राष्ट्रवादी.....................4

नव्या सभागृहात यात थेट नगराध्यक्षपदाचा विजेता उमेदवार सदस्य म्हणून वाढणार आहे. मार्च 13 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत युतीने निवडणूक लढवत सेना-भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले. युतीचा संसार अडीच वर्षे सुरळित होता, मात्र अंतर्गत कुरबुरी वाढल्याने भाजपने वेगळी वाट निवडत सेनेला धोबीपछाड देत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. त्यावेळेपासून शहरात शिवसेना-भाजपमधून विस्तवही जात नाही. 

यावेळी दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरणार आहेत. यामुळे नव्या सभागृहात कुणाचे सदस्य जास्त असणार याकडे देवरूखवासीयांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या आधीच 17 उमेदवार निश्‍चित करीत भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवारही निवडला आहे. याबाबत सेनेत अद्याप शांतताच आहे. सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी एकमेव नाव पुढे आले आहे. त्यावर शिक्‍कामोर्तब होणे बाकी आहे. 

एकहाती वर्चस्वासाठी सेना आणि भाजपला आधी नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणणे क्रमप्राप्त ठरणार आहे. यामुळे दोन्ही पक्षांची राजकीय प्रतिष्ठा देवरुखात पणाला लागणार हे निश्‍चित झाले आहे. सेनेकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख प्रमोद पवार इथली सूत्र हलविणार आहेत, तर भाजपकडून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष बाळ माने, तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव निवडणुकीची सूत्र हलविणार आहेत. या दिग्गज मंडळींच्या रणसंग्रामात कुणाची सरशी होणार याचे उत्तर 7 एप्रिलला मिळेल.

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election